jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात १६-१७ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय इ-शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा संपन्न

Date : 2018-10-18

देवरुख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी समिती आणि ग्रंथालयामार्फत १६ व १७ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत राज्यस्तरीय “इ-शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा” संपन्न झाली.

‘सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तंत्रज्ञानातील विकासामुळे पूर्वीची पारंपारिक वर्गांची संकल्पना दूर होऊन इ-क्लासरूमची संकल्पना वाढीस लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कार्यशाळेमुळे महाराष्ट्रातील विशेषतः कोकणातील शिक्षकांमध्ये तंत्रज्ञानाबद्दलची गोडी निर्माण होईल तसेच मोबाइलचा वापर करून त्वरित सोप्या पद्धतीने ऑडिओ-व्हिडिओ निर्मिती करता येईल असे मत महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी उदघाटनप्रसंगी व्यक्त केले.

सदरची कार्यशाळा नॉलेज ब्रीज, अहमदनगर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. श्री. भूषण कुलकर्णी आणि श्री. एकनाथ कोरे यांनी या कार्यशाळेत अनमोल असे मार्गदर्शन केले. प्रोजेक्टर बेस सेमिनार प्रकारच्या या कार्यशाळेत मोटीव्हेशन, कन्सेप्ट क्लियरिंग, काही ऑन स्टेज प्रॅक्टिकल आणि काही वैयक्तिक प्रॅक्टिकल यांचा समावेश होता. तसेच या कार्यशाळेत मोबाईल आणि संगणकाचा उपयोग करून उत्तम दर्ज्याचे शैक्षणिक व्हिडीओ कसे निर्माण करता येतात, याचे प्रशिक्षण दिले.

या कार्यशाळेत महाराष्ट्रातील एकूण ९० शिक्षक/प्राध्यापक सहभागी झाले होते, अशी माहिती डॉ. सरदार पाटील यांनी दिली. या कार्यशाळेच्या आयोजनामध्ये श्री. सुभाष मायंगडे, श्री. अरविंद कुलकर्णी, डॉ. मीरा काळे व डॉ. प्रताप नाईकवाडे यांनी विशेष कष्ट घेतले.