jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

शैक्षणिक परितोषिक वितरण समारंभ

Date : 2019-11-26
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या शैक्षणिक परितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. सुनीलजी चव्हाण यांची उपस्थिती व मार्गदर्शन....
पालकांनी पाल्यांमधील गुण ओळखले पाहिजेत. आपल्या इच्छा आकांक्षा त्यांच्यावरती न लादता त्यांच्या उद्दिष्टांप्रमाणे त्यांना ध्येय गाठण्यास मदत करावी. केवळ पाल्याकडे एटीएम म्हणून न पाहता त्यांना संस्कारक्षम बनवा, असे प्रतिपादन करतानाच विद्यार्थी वर्गाने पालकांसोबत शिक्षकांचा आदर बाळगून उच्चपदस्थ अधिकारी, शास्त्रज्ञ, समाजसेवक बनावे असा मौलिक सल्ला मा. जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले सचिन तेंडोलकर सारखा दहावी नापास झालेला तरुण उत्कृष्ठ क्रिकेटर बनून विश्वविक्रम निर्माण करू शकतो. याबरोबरच हिवरे बाजार सारख्या गावचे सरपंच पोपटराव पवारांसारखा एखादा माणूस एखादी आदर्श योजना निर्माण करू शकतो. यामुळे त्यांच्या भेटीला मंत्रीगण देखील जातात. अशासारखी महान व्यक्तिमत्व घडवण्या करिता जिद्द, चिकाटी, मेहनत आणि प्रामाणिकपणा महत्वाचा असतो. म्हणूनच तुम्ही विद्यार्थ्यानी तुमचे उद्दीष्ट निश्चित करून त्यांना प्रयत्नांची जोड द्या. प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, जिद्द, ध्येय, उत्तम चिकाटी याच्या बरोबरच पालकांचे संस्कार याच्या जोरावर तुम्ही देखील उद्याचे चांगले अधिकारी, डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम सारखे शास्त्रज्ञ, थोर समाजसुधारक घडू शकता असा आशावाद श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.
अपयश आले तरी खचून न जाता दुसर्‍या संधीचा फायदा उठवत चंद्राला हात लावण्याची मनिषा बाळगा असेही त्यांनी संगितले. याबरोबरच आपण जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास आराखडा तयार केला आहे. २७ सस्थांच्या माध्यमातून हे धडे देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. सदानंदजी भागवत, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. नरेंद्र तेंडोलकर, देवरुखचे तहसिलदार मा. सुहास थोरात, देवरुख नगरपंचायत मुख्याधिकारी मा. प्रियंका राजपूत , प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.