jQuery Bootstrap Submenu Plugin Demo

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात बी. व्होक. या नवीन अभ्यासक्रमाचे कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन

Date : 2020-10-27
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात नव्याने सुरू होत असलेल्या युजीसी मान्यताप्राप्त कौशल्याधिष्ठित बॅचलर ऑफ वोकेशन (बी. व्होक.) या अभ्यासक्रमाचे औपचारिक उद्घाटन सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुहासजी पेडणेकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले. या उद्घाटन समारंभास यूजीसीचे अतिरिक्त सचिव डॉ. श्रीनिवास, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. नरेशचंद्र, कोकण प्रांत उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप, यूजीसी प्रतिनिधी प्रा. परिहार तसेच ज्या कंपन्यांबरोबर महाविद्यालयाने कौशल्य शिक्षण देण्याच्यादृष्टीने सामंजस्य करार केले आहेत त्यांचे अधिकारी अधीशासक मंडळ व शैक्षणिक परिषदेचे सदस्य विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विविध विषयांच्या अभ्यास मंडळाचे सदस्य, देवरूख परिसरातील विविध हायस्कूलचे मुख्याध्यापक, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार बंधु, प्राध्यापक, विद्यार्थी व पालकही उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विशिष्ट व्यवसायासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याच्या दृष्टीने यूजीसीने बी. व्होक. इन अप्लाइड केमिस्ट्री, जिओइन्फॉर्मेटिक्स इन रुरल रिसोर्स मॅपिंग, सस्टेनेबल अग्रिकल्चर व बँकिंग अँड फिनान्शियल सर्विसेस हे चार अभ्यासक्रम सुरू करण्यास महाविद्यालयास मान्यता दिल्याचे सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. सदानंद भागवत यांनी रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असून या अभ्यासक्रमाचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. या अभ्यासक्रमासाठी नवीन इमारत आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याप्रसंगी नवीन इमारतीचा आराखडा ही त्यांनी सादर केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी या प्रकल्पास पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या भरीव आर्थिक योगदानाबद्दल देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद अध्यक्ष मा. बाळासाहेब जोशी यांचा संस्थाध्यक्ष श्री सदानंद जी भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी मा. कुलगुरू सुहास जी पेडणेकर यांनी या अभ्यासक्रमांचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून महाविद्यालयाचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात भविष्यात शैक्षणिक पद्धतीत अमुलाग्र बदल होऊ घातले असून त्याला आपल्याला कशा प्रकारे सामोरे जायचे आहे यावर प्रकाशझोत टाकला. त्यासाठी सगळ्यात मोठे योगदान हे शिक्षण संस्था आणि शिक्षक यांचे असणार आहे. देशाची प्रगती ही त्या देशाच्या शिक्षण संस्था आणि शिक्षण पद्धतीवर अवलंबून असते असेही ते याप्रसंगी म्हणाले. पुढील पाच ते दहा वर्षात जवळजवळ 250 दशलक्ष विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात बाहेर पडतील या सर्वांना त्यावेळी नोकऱ्या उपलब्ध होणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे भविष्यात नुसत्या पारंपारिक शिक्षणाऐवजी ज्ञान व कौशल्य यांचे मिश्रण असलेले अभ्यासक्रम मुलांना उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यातून केवळ नोकरीच नाही तर उद्योजक तयार व्हायला मदत होईल. असे कौशल्याधिष्ठित कोर्सेस सुरू करण्याची संधी ही स्वायतत्तेमुळे महाविद्यालयाला प्राप्त झाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. नवीन शैक्षणिक धोरण याला अनुसरून काळाची गरज ओळखून महाविद्यालय चालू करत असलेले उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत असेही ते याप्रसंगी म्हणाले.
त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाचे अतिरिक्त सचिव डॉ. श्रीनिवास, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र, कोकण विभाग उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी महाविद्यालय या अभ्यासक्रमाच्या रूपाने जी नवीन संधी उपलब्ध करून देणार आहे त्याबाबत महाविद्यालयाचे कौतुक केले आणि नवीन अभ्यासक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविले जातील असा विश्वास ही व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. वर्षा फाटक यांनी केले तर आभार समन्वयक डॉ. हेमंत चव्हाण यांनी मानले.