प्रा. डॉ. नाईकवाडे करणार संशोधन ; रानभाज्या, जंगली फळांचा अभ्यास
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या “आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांना महाराष्ट्र राज्य जैवविविधता अभ्यासासाठी २८ लाख ५० हजार रुपये अनुदान संशोधन प्रकल्पासाठी मंजूर झाले आहे. या संशोधनाचा उद्देश रानभाज्या व जंगली फळांच्या पोषणमूल्याचा तसेच औषधी गुणधर्मांचा सखोल अभ्यास करून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध करून देणे आहे.
या प्रकल्पात कोकणातील रानभाज्या आणि जंगली फळे यांचे पोषण मूल्य, उपलब्धता, औषधी गुणधर्म, आर्थिक संधी यावर संशोधन होणार आहे. या संशोधनाचा कालावधी तीन वर्षे आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत हा एकमेव प्रकल्प मंजूर झालेला आहे. आठवडाभरापूर्वी महाविद्यालयाच्या स. का. पाटील संशोधन केंद्रामधून विज्ञान विषयातील पहिली विद्यावाचस्पती पदवी डॉ. अनिल निकम यांनी रसायन शास्त्र विषयात मिळवली. त्यांच्या यशानंतर लगेचच वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. नाईकवाडे यांना महाराष्ट्र राज्य जैवविविधता अभ्यासासाठी २८ लाख ५० हजार रुपये अनुदान संशोधन प्रकल्पासाठी मंजूर झाले आहे. ही गोष्ट अभिमानास्पद यश आहे.
डॉ. नाईकवाडे यांच्या या प्रकल्पाद्वारे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल. या अभ्यासातून स्थानिक प्रजातींचे महत्त्व समजून घेतले जाईल व त्यांचा उपयोग समाजासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.
संशोधनाद्वारे औषधी व पोषणमूल्य असलेल्या वनस्पतींचा वापर कसा करता येईल, यावर विशेष भर दिला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला हातभार लागेल. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा आहे.
या अनुदानामुळे संशोधनाच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार असून डॉ. नाईकवाडे यांच्या प्रकल्पामुळे स्थानिक जैवसंपत्तीचा अभ्यास अधिक प्रमाणात होईल.
या संशोधन प्रकल्पातून भविष्यात कोकणातील शेतकरी व बागायतदाराना लाभ होऊ शकणार आहे. डॉ. नाईकवाडे यांच्यासारखे संशोधक-प्राध्यापक निर्माण करून कोकण विकासाला चालना मिळावी यासाठी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ कटिबद्ध आहे. डॉ. नाईकवाडे यांचे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने अध्यक्ष मा. श्री. सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिनंदन केले आहे.