देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयामध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट दिली.
शिक्षकांना ग्रंथालयाचा मोफत प्रवेश (फ्री अॅक्सेस) देण्यात आला. यामुळे शिक्षकांनी संपूर्ण ग्रंथालयातील विविध विभागांची तपशीलवार पाहणी केली. त्यांनी ग्रंथालयातील कपाटांमधील पुस्तके आवडीने चाळून पाहिली तसेच काही जुनी व दुर्मिळ पुस्तके काळजीपूर्वक जतन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रदर्शनास संस्थेचे उपाध्यक्ष मा. कृष्णकुमार भोसले यांनी देखील भेट दिली. त्यांनी प्रदर्शनाची मांडणी व उपक्रमांचे कौतुक करत ग्रंथालयाच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आयोजित पुस्तक व दिवाळी विशेषांक प्रदर्शनातील उत्कृष्ट मांडणी पाहून शिक्षक भारावून गेले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल सुभाष मायंगडे यांनी उपस्थितांना ग्रंथालयातील विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी तसेच वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जातात.
शिक्षकांनी महाविद्यालयाच्या वाचनसंस्कृती वृद्धीसाठी चाललेल्या प्रयत्नांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा देण्यासाठी राबवलेल्या या अभिनव उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व उप-प्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांचा लाभ मिळत आहे.
ग्रंथपालांनी नमूद केले की, अशा उपक्रमांमुळे वाचन संस्कृतीला नवी दिशा मिळत आहे आणि विद्यार्थी व शिक्षक दोघांनाही अभ्यास व ज्ञानवृद्धीसाठी हे ग्रंथालय उपयुक्त ठरत आहे.
ग्रंथालयाच्या यशस्वी उपक्रमांमागे ग्रंथालय सहाय्यक श्री. स्वप्नील कांगणे आणि श्री. रोशन गोरूले यांची मेहनत व समर्पण उल्लेखनीय आहे. त्यांनी ग्रंथालय व्यवस्थापन आणि प्रदर्शन मांडणीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.