देवरुख: देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे- पित्रे स्वायत्त महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या राज्यव्यापी महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘पुस्तक आपल्या दारी’ उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत देवरुख पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, आणि नगरपंचायत कार्यालयाला वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश संबंधित कर्मचारीवर्गाला वाचनाच्या माध्यमातून मानसिक शांती देणे आणि कामातील तणाव कमी करणे हा होता.
पोलीस कर्मचारी अनेकदा तणावग्रस्त परिस्थितीत काम करत असल्याने वाचन त्यांच्यासाठी मानसिक विश्रांतीचे प्रभावी साधन ठरेल. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत उपलब्ध झालेल्या पुस्तकांमुळे त्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होऊन नवीन ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल. वाचनाच्या सवयीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी आपल्या भाषणात केले.
प्रशासनातील दैनंदिन कामाच्या दबावातून बाहेर पडण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील कर्मचार्यांनी वाचनाचा स्वीकार केला. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत देण्यात आलेल्या पुस्तकांनी त्यांना ताजेतवाने होण्याची संधी दिली. वाचनाने विचारांच्या खुलासणीसोबतच ताणतणाव कमी करण्यास आणि नवीन दृष्टीकोन निर्माण करण्यास मदत होईल.
‘पुस्तक आपल्या दारी’ उपक्रमामुळे नगरपंचायत कार्यालयातील कर्मचार्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली. वाचनामुळे त्यांचा कामाचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला असून त्यांना मानसिक शांती आणि तणावमुक्तीचा अनुभव मिळाला आहे. वाचनाने त्यांच्या कामाच्या गुणवत्तेतही सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्रात वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे आहे. याच अनुषंगाने ‘पुस्तक आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्यात आला. यामुळे केवळ वाचनाची गोडी वाढली नाही, तर मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास देखील मोठी मदत झाली आहे.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी उप-प्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल श्री. सुभाष मायंगडे, प्रा. अजित जाधव, ग्रंथालय सहाय्यक स्वप्नील कांगणे, रोशन गोरूले तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा उपक्रम भविष्यात महाराष्ट्रातील इतर शासकीय कार्यालयांमध्येही राबविण्यात यावा अशी मागणी होत आहे. वाचन हे ज्ञानवर्धन आणि मानसिक समाधानासाठी महत्त्वाचे साधन असल्याचे या उपक्रमाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.