देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय (स्वायत्त), देवऱुखच्या इंग्रजी विभागात कार्यरत प्रा. कु. स्वप्ना नितीन पुरोहित यांनी राष्ट्रीय स्तरावरील “इमब्लेम ऑफ एक्सलन्स” कविता लेखन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ५५६३ स्पर्धकांमधून सर्वोत्तम २० विजेत्यांची निवड करण्यात आली, यामध्ये त्यांच्या “सी, सोल अँड आय…” या कवितेने ५ वे स्थान प्राप्त केले आहे.
प्रा. स्वप्ना पुरोहित यांची कविता जीवनातील शाश्वत चैतन्य, सकारात्मकता आणि ऊर्जेच्या अखंड स्त्रोताचे दर्शन घडवते. कवितेत समुद्राच्या अथांग, अमर्यादित आणि अखंड स्वरूपाची तुलना जीवनातील अमरत्वाशी केली आहे. आत्म्याचे अमरत्व आणि देहाचे नश्वरत्व या दोन्ही सत्यांचा स्वीकार केला असून, हे समजून घेतल्यावरच जीवन आणि ध्येयप्राप्ती यांचा खरा अर्थ उलगडतो. स्पर्धेतील उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना प्रमाणपत्र, प्रशंसापत्र, चषक आणि पदक प्रदान करण्यात आले आहे. एपिक स्पेअर आणि कॉस्मिक इन्सेप्शन यांच्या “इमब्लेम ऑफ एक्सलन्स अवॉर्ड” अंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हे प्रकाशन एम. एस. एम. ई. आणि आय. एस. ओ. प्रमाणित आहे. प्रा. स्वप्ना पुरोहित यांनी मिळवलेल्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.