Award of Autonomous Status by UGC, New Delhi (2019-20) | Star Education Award- 2023 | Best College Award- 2009-10 | Best Principal Award- 2022 | NAAC Accredited ‘A’ Grade (Third Cycle-2015-16) | Best College NSS Unit Award by MU (2015-16, 2022-23)| Jagar Janivancha Award (2012-13, 2013-14)

Devrukh Shikshan Prasarak Mandal’s

NYA. TATYASAHEB ATHALYE ARTS, VED. S. R. SAPRE COMMERCE &
VID. DADASAHEB PITRE SCIENCE COLLEGE, DEVRUKH (AUTONOMOUS)

Late Kakasaheb Pandit Educational Complex, Devrukh,
Tal. Sangameshwar Dist. Ratnagiri – 415 804 ( Maharashtra, India)

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ‘रसायनशास्त्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर ऑनलाइन परिसंवाद उत्साहात संपन्न

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्यावतीने   ‘रसायनशास्त्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये पदवी व पदव्युत्तर रसायनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शैक्षणिक, औद्योगिक व शासकीय क्षेत्रातील करिअरच्या विविध वाटा विद्यार्थ्यांपुढे उलगडून दाखवण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमात दोन सत्रांद्वारे मान्यवर तज्ज्ञांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

पहिल्या सत्रात जॉन्सन एम. कौटिन्हो, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, सिंजीन इंटरनॅशनल लिमिटेड, बंगळुरू यांनी ‘फार्मास्युटिकल उद्योगातील संधी’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. त्यांनी औषध संशोधनातील सध्याच्या घडामोडी, प्रकल्प व्यवस्थापनाची भूमिका आणि संशोधन व विकास क्षेत्रातील करिअर पर्यायांविषयी मार्गदर्शन केले. सेंद्रिय रसायनशास्त्राचे महत्त्व, औद्योगिक गरजा तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारची तयारी करावी यासंबंधी उपयुक्त माहिती दिली. त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. बापूराव शिंगटे, वरिष्ठ प्राध्यापक, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर यांनी ‘रसायनशास्त्रातील उच्च शिक्षण आणि शासकीय व खाजगी क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आय.आय.टी., एन.आय.टी., आय. आय. एससी., केंद्रीय व राज्य विद्यापीठे यामधील प्रवेशप्रक्रिया, उपलब्ध जागा तसेच जॅम, गेट, नेट यासारख्या स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. तसेच शासकीय क्षेत्रातील संधी जसे की, विविध वैज्ञानिक संशोधन संस्था, शिक्षण क्षेत्र, सरकारी प्रयोगशाळा व इतर खात्यांमधील नोकऱ्यांचे स्वरूप, पात्रता व निवड प्रक्रिया यांची माहिती दिली. खाजगी क्षेत्रातील करिअर, विशेषतः फार्मास्युटिकल कंपन्या, रासायनिक उद्योग, संशोधन आणि विकास युनिट्स व गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा यामध्ये उपलब्ध असलेल्या संधी व त्यासाठी आवश्यक कौशल्यांचीही माहिती दिली.

परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी केला. आपल्या समारोपपर भाषणात डॉ. पाटील यांनी या प्रकारच्या कार्यशाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराच्या बदलत्या संधी विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने महत्त्वाच्या असून या कार्यशाळेमुळे रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उद्योग आणि शासकीय तसेच अशासकीय संस्थांमध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी प्राप्त करण्यासाठी योग्य दिशा मिळेल, असे मत व्यक्त केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सदर कार्यशाळेला शुभेच्छा देताना, कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल रसायनशास्त्र विभागाचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता या प्रकारच्या कार्यशाळा महत्त्वाच्या आहेत, असे मत व्यक्त केले. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सागर संकपाळ, प्रा. डॉ. हेमंत चव्हाण, प्रा. डॉ. अमित वराळे, प्रा. शुभम डाफळे, प्रा. अजित देवळे, प्रा. प्रज्ञा शिंदे, प्रा. ओंकार गोडे आणि तांत्रिक सहाय्यक संतोष जाधव यांनी मेहनत घेतली.