
देवरुख, १२ ऑगस्ट २०२५:
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३३व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे ग्रंथपालांनी या दिवसाचे महत्त्व आणि डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. त्यांनी आधुनिक ग्रंथालय व्यवस्थापन, माहितीप्राप्ती व वाचनसंस्कृतीविषयी डॉ. रंगनाथन यांच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या वेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. वाचनाद्वारे ज्ञान, चिंतन व व्यक्तिमत्व विकास साधता येतो, असे ते म्हणाले.

महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त करत, वाचनसंस्कृती जपण्याची आणि माहितीचा योग्य उपयोग करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे सांगितले.
कार्यक्रमानिमित्त ग्रंथालयात नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी या प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुस्तकांचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय सहाय्यक स्वप्नील कांगणे, रोशन गोरूले व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.