
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
देवरुख : आठल्ये-सप्रे-पित्रे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध परीक्षामध्ये यश संपादन करून प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी डॉ. आसावरी संसारे (तहसीलदार, महसूल विभाग, रत्नागिरी) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख डॉ. चनय्या हिरेमठ यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून विद्यावाचस्पती पदवी संपादित केल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला
तसेच महाविद्यालयाच्या एस. के. पाटील आंतरशाखीय संशोधन केंद्रातून पीएच.डी. पूर्ण केलेले संशोधक विद्यार्थी तसेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) आणि राज्य पात्रता परीक्षा (SET) उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेवर प्रेम करणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या नावे महाविद्यालात अंतिम परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती देण्यात आल्या. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण ४७ विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात परीक्षा नियंत्रक डॉ. सागर संकपाळ यांनी परीक्षेच्या निकालाबाबत सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी अधिकाधिक उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित होऊन महाविद्यालयातील पीएच.डी. संशोधन केंद्राच्या सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, असे आवाहन केले. प्रमुख पाहुण्या डॉ. आसावरी संसारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगत “कधीही हार मानू नका, कठोर परिश्रम करा, यश नक्कीच मिळेल” असा संदेश दिला.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. शिरीष फाटक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, शिष्यवृत्ती देणाऱ्या सर्व मान्यवरांचे तसेच संस्थेवर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एम. आर. लुंगसे यांनी आभारप्रदर्शन केले आणि समारंभाची सांगता झाली.