आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न देवरुख : आठल्ये-सप्रे-पित्रे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध परीक्षामध्ये यश संपादन करून प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी डॉ. आसावरी संसारे (तहसीलदार, महसूल विभाग, रत्नागिरी) प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख डॉ. चनय्या हिरेमठ यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून विद्यावाचस्पती पदवी संपादित केल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला तसेच महाविद्यालयाच्या एस. के. पाटील आंतरशाखीय संशोधन केंद्रातून पीएच.डी. पूर्ण केलेले संशोधक विद्यार्थी तसेच राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) आणि राज्य पात्रता परीक्षा (SET) उत्तीर्ण विद्यार्थी यांचा गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेवर प्रेम करणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या नावे महाविद्यालात अंतिम परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती देण्यात आल्या. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण ४७ विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात परीक्षा नियंत्रक डॉ. सागर संकपाळ यांनी परीक्षेच्या निकालाबाबत सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी अधिकाधिक उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित होऊन महाविद्यालयातील पीएच.डी. संशोधन केंद्राच्या सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, असे आवाहन केले. प्रमुख पाहुण्या डॉ. आसावरी संसारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कथा सांगत “कधीही हार मानू नका, कठोर परिश्रम करा, यश नक्कीच मिळेल” असा संदेश दिला. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. शिरीष फाटक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, शिष्यवृत्ती देणाऱ्या सर्व मान्यवरांचे तसेच संस्थेवर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एम. आर. लुंगसे यांनी आभारप्रदर्शन केले आणि समारंभाची सांगता झाली.
राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३३व्या जयंतीचे महाविद्यालयात उत्साहात आयोजन
देवरुख, १२ ऑगस्ट २०२५: देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३३व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात महाविद्यालयाचे ग्रंथपालांनी या दिवसाचे महत्त्व आणि डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा सविस्तर आढावा सादर केला. त्यांनी आधुनिक ग्रंथालय व्यवस्थापन, माहितीप्राप्ती व वाचनसंस्कृतीविषयी डॉ. रंगनाथन यांच्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या वेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना अधिकाधिक वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. वाचनाद्वारे ज्ञान, चिंतन व व्यक्तिमत्व विकास साधता येतो, असे ते म्हणाले. महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व अभिनंदन व्यक्त करत, वाचनसंस्कृती जपण्याची आणि माहितीचा योग्य उपयोग करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे सांगितले. कार्यक्रमानिमित्त ग्रंथालयात नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी या प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुस्तकांचा आनंद लुटला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रंथालय सहाय्यक स्वप्नील कांगणे, रोशन गोरूले व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ‘रसायनशास्त्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर ऑनलाइन परिसंवाद उत्साहात संपन्न
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्यावतीने ‘रसायनशास्त्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर एक दिवसीय ऑनलाइन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये पदवी व पदव्युत्तर रसायनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शैक्षणिक, औद्योगिक व शासकीय क्षेत्रातील करिअरच्या विविध वाटा विद्यार्थ्यांपुढे उलगडून दाखवण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमात दोन सत्रांद्वारे मान्यवर तज्ज्ञांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात जॉन्सन एम. कौटिन्हो, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, सिंजीन इंटरनॅशनल लिमिटेड, बंगळुरू यांनी ‘फार्मास्युटिकल उद्योगातील संधी’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. त्यांनी औषध संशोधनातील सध्याच्या घडामोडी, प्रकल्प व्यवस्थापनाची भूमिका आणि संशोधन व विकास क्षेत्रातील करिअर पर्यायांविषयी मार्गदर्शन केले. सेंद्रिय रसायनशास्त्राचे महत्त्व, औद्योगिक गरजा तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारची तयारी करावी यासंबंधी उपयुक्त माहिती दिली. त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. बापूराव शिंगटे, वरिष्ठ प्राध्यापक, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर यांनी ‘रसायनशास्त्रातील उच्च शिक्षण आणि शासकीय व खाजगी क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आय.आय.टी., एन.आय.टी., आय. आय. एससी., केंद्रीय व राज्य विद्यापीठे यामधील प्रवेशप्रक्रिया, उपलब्ध जागा तसेच जॅम, गेट, नेट यासारख्या स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. तसेच शासकीय क्षेत्रातील संधी जसे की, विविध वैज्ञानिक संशोधन संस्था, शिक्षण क्षेत्र, सरकारी प्रयोगशाळा व इतर खात्यांमधील नोकऱ्यांचे स्वरूप, पात्रता व निवड प्रक्रिया यांची माहिती दिली. खाजगी क्षेत्रातील करिअर, विशेषतः फार्मास्युटिकल कंपन्या, रासायनिक उद्योग, संशोधन आणि विकास युनिट्स व गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा यामध्ये उपलब्ध असलेल्या संधी व त्यासाठी आवश्यक कौशल्यांचीही माहिती दिली. परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी केला. आपल्या समारोपपर भाषणात डॉ. पाटील यांनी या प्रकारच्या कार्यशाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराच्या बदलत्या संधी विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने महत्त्वाच्या असून या कार्यशाळेमुळे रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उद्योग आणि शासकीय तसेच अशासकीय संस्थांमध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी प्राप्त करण्यासाठी योग्य दिशा मिळेल, असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सदर कार्यशाळेला शुभेच्छा देताना, कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल रसायनशास्त्र विभागाचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता या प्रकारच्या कार्यशाळा महत्त्वाच्या आहेत, असे मत व्यक्त केले. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सागर संकपाळ, प्रा. डॉ. हेमंत चव्हाण, प्रा. डॉ. अमित वराळे, प्रा. शुभम डाफळे, प्रा. अजित देवळे, प्रा. प्रज्ञा शिंदे, प्रा. ओंकार गोडे आणि तांत्रिक सहाय्यक संतोष जाधव यांनी मेहनत घेतली.
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ‘रसायनशास्त्रात विषयातील करिअरच्या संधी’ या विषयावर एक दिवसीय परिसंवाद उत्साहात संपन्न
देवरुख (ता. संगमेश्वर)- आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक २९ जुलै २०२५ रोजी “रसायनशास्त्रातील करिअरच्या संधी” या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादामध्ये पदवी व पदव्युत्तर रसायनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शैक्षणिक, औद्योगिक व शासकीय क्षेत्रातील करिअरच्या विविध वाटा विद्यार्थ्यांपुढे उलगडून दाखवण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमात दोन सत्रांद्वारे मान्यवर तज्ज्ञांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात, श्री. जॉन्सन एम. कौटिन्हो, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, सिंजीन इंटरनॅशनल लिमिटेड, बंगळुरू यांनी “फार्मास्युटिकल उद्योगातील संधी” या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. त्यांनी औषध संशोधनातील सध्याच्या घडामोडी, प्रकल्प व्यवस्थापनाची भूमिका, आणि R&D क्षेत्रातील करिअर पर्यायांविषयी मार्गदर्शन केले. सेंद्रिय रसायनशास्त्राचे महत्त्व, औद्योगिक गरजा तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारची तयारी करावी यासंबंधी त्यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. दुसऱ्या सत्रात, प्रा. डॉ. बापूराव शिंगटे, वरिष्ठ प्राध्यापक, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर यांनी “रसायनशास्त्रातील उच्च शिक्षण आणि शासकीय व खाजगी क्षेत्रातील करिअर संधी” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी IIT, NIT, IISc, केंद्रीय व राज्य विद्यापीठे यामधील प्रवेशप्रक्रिया, उपलब्ध जागा तसेच JAM, GATE, CSIR-NET यांसारख्या स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. तसेच, शासकीय क्षेत्रातील संधी जसे की विविध वैज्ञानिक संशोधन संस्था, शिक्षण क्षेत्र, सरकारी प्रयोगशाळा व इतर खात्यांमधील नोकऱ्यांचे स्वरूप, पात्रता व निवड प्रक्रिया यांची माहिती दिली. खाजगी क्षेत्रातील करिअर, विशेषतः फार्मास्युटिकल कंपन्या, रासायनिक उद्योग, R&D युनिट्स आणि गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा यामध्ये उपलब्ध असलेल्या संधी व त्यासाठी आवश्यक कौशल्यांचीही माहिती दिली. परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी केला. आपल्या समारोपपर भाषणात डॉ पाटील यांनी या प्रकारच्या कार्यशाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराच्या बदलत्या संधी विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने महत्त्वाच्या असून या कार्यशाळेमुळे रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उद्योग आणि शासकीय तसेच अशासकीय संस्थांमध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी मिळविण्यासाठी योग्य दिशा मिळेल, असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर यांनी सदर कार्यशाळेला शुभेच्छा देताना कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल रसायनशास्त्र विभागाचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता या प्रकारच्या कार्यशाळा महत्त्वाच्या आहेत, असे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय स्तरावरील “इमब्लेम ऑफ एक्सलन्स” कविता लेखन स्पर्धेत देवरुख महाविद्यालयाच्या प्रा. स्वप्ना पुरोहित यांचा गौरव
देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय (स्वायत्त), देवऱुखच्या इंग्रजी विभागात कार्यरत प्रा. कु. स्वप्ना नितीन पुरोहित यांनी राष्ट्रीय स्तरावरील “इमब्लेम ऑफ एक्सलन्स” कविता लेखन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ५५६३ स्पर्धकांमधून सर्वोत्तम २० विजेत्यांची निवड करण्यात आली, यामध्ये त्यांच्या “सी, सोल अँड आय…” या कवितेने ५ वे स्थान प्राप्त केले आहे. प्रा. स्वप्ना पुरोहित यांची कविता जीवनातील शाश्वत चैतन्य, सकारात्मकता आणि ऊर्जेच्या अखंड स्त्रोताचे दर्शन घडवते. कवितेत समुद्राच्या अथांग, अमर्यादित आणि अखंड स्वरूपाची तुलना जीवनातील अमरत्वाशी केली आहे. आत्म्याचे अमरत्व आणि देहाचे नश्वरत्व या दोन्ही सत्यांचा स्वीकार केला असून, हे समजून घेतल्यावरच जीवन आणि ध्येयप्राप्ती यांचा खरा अर्थ उलगडतो. स्पर्धेतील उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना प्रमाणपत्र, प्रशंसापत्र, चषक आणि पदक प्रदान करण्यात आले आहे. एपिक स्पेअर आणि कॉस्मिक इन्सेप्शन यांच्या “इमब्लेम ऑफ एक्सलन्स अवॉर्ड” अंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हे प्रकाशन एम. एस. एम. ई. आणि आय. एस. ओ. प्रमाणित आहे. प्रा. स्वप्ना पुरोहित यांनी मिळवलेल्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
देवरुख महाविद्यालयात ‘प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण’ वर्गाचा शुभारंभ
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ व ज्ञानदा गुरुकुल संस्था, वाघोली, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख येथे ‘प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ज्ञानदा गुरुकुल संस्थेचे मोबिलायझेशन ऑफिसर श्री. सोमनाथ कुलकर्णी, टेक्निकल हेड श्री. सुरज पाटील, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. १८ ते ३० या वयोगटातील तरुणांसाठी हा अभ्यासक्रम ज्ञानदा गुरुकुल संस्थेने तयार केला आहे. या अंतर्गत दोन महिन्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना दिले जाते. अत्यल्प शुल्कामध्ये हा कोर्स महाविद्यालयामध्ये उपलब्ध झाला आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमाचे शुल्क नाममात्र ३,०००/- रुपये आहे. या शुल्कामध्येच देवरुख व पुणे या दोन्ही ठिकाणचे प्रशिक्षण समाविष्ट आहे. हा अभ्यासक्रम १००% नोकरीची हमी देणारा असून, आजवर जवळपास सोळाशे तरुण या अभ्यासक्रमानंतर स्वावलंबी झाले आहेत. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयामध्ये सुरू झाली असून, त्याकरिता समन्वयक प्रा. विकास शृंगारे, प्रा. डॉ. मयुरेश राणे, प्रा.अभिनय पातेरे यांच्याशी संपर्क साधावा. संस्थेने सुरू केलेल्या या अभ्यासक्रमाचा लाभ जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष श्री. सदानंद भागवत व उपाध्यक्षा सौ.नेहा जोशी यांनी केले आहे.
आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या द. ज. कुलकर्णी सभागृहात वरिष्ठ विभागाचा वार्षिक परितोषिक वितरण समारंभ उल्हासपूर्ण वातावरणात सपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी उपस्थित होते. सरस्वती पूजन आणि उपस्थितांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रगती शिंदे हिने करताना कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केले. ▪️कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी करताना महाविद्यालयातील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. उपस्थित विद्यार्थ्यांना सामाजिक प्रसार माध्यमांचा वापर विधायक कार्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानार्जनासाठी करण्याविषयी याप्रसंगी आवाहन केले. तसेच बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ. सुरेश जोशी यांचा परिचय प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी करून दिला. संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले यांनी डॉ. सुरेश जोशी यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले, तर प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ▪️वार्षिक अहवालाचे वाचन विद्यार्थिनी पायल दोरखडे हिने केले. या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये क्रिडा, कला व सांस्कृतिक स्पर्धा-उपक्रमातील नैपुण्यासाठी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाकडून दिली जाणारी विशेष रोख रकमेची पारितोषिके विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली. याप्रसंगी ‘स्व. राजा राजवाडे उत्कृष्ट वार्षिकांक पुरस्काराचे’ वितरण करण्यात आले. या वार्षिक अंक स्पर्धेचे परीक्षण निवृत्त शिक्षिका सौदामिनी कुलकर्णी व मंगला अळवणी यांनी केले होते. या स्पर्धेतील गोगटे–जोगळेकर महाविद्याल, रत्नागिरी (प्रथम), डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण (द्वितीय) आणि आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्याल, देवरुख (तृतीय) यांना सन्मानित करण्यात आले. वार्षिक क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करणाऱ्या तृतीय वर्ष, विज्ञान वर्गाला सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण यादीचे वाचन विद्यार्थिनी प्रीती पाष्टे हिने केले. ▪️डॉ. सुरेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा जीवन प्रवास आपल्या मार्गदर्शनातून सांगितला. त्यांच्या देवरुखमधील ५० वर्षांपेक्षा अधिक वास्तव्यातील आठवणींना उजाळा दिला. आपल्या मनोगताच्या शेवटी त्यांनी विषमता विरहित समाज उभारणीतील तरुणांची भूमिका अधोरेखित केली आणि तरुणांनी विदेशात न जाता भारतातच राहून देशाची व समाजाची सेवा करावी असे आवाहन याप्रसंगी केले. ▪️संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांना मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम विशद केले. त्यांनी तरुणांना स्वतःचा विकास करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहनही याप्रसंगी केले. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संस्था कार्यवाह शिरीष फाटक, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. डॉ. अमित वराळे आणि विद्यार्थी विद्यापीठ प्रतिनिधी सुयोग रहाटे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थिनी ऋतुजा पवार हिने केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
‘पुस्तक आपल्या दारी’ उपक्रम ग्रामीण भागातील वाचनसंस्कृतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
‘पुस्तक आपल्या दारी’ उपक्रम ग्रामीण भागातील वाचनसंस्कृतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या राज्यव्यापी उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘पुस्तक आपल्या दारी’ हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. ग्रामीण भागात वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी ‘पुस्तक आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पाटगाव, हातीव आणि देवरुख येथे विविध ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक भेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून ज्ञानवृद्धीसाठी प्रेरणा दिली. पाटगाव व हातीव गावांमध्ये बाल साहित्य, साहित्यिक आणि शैक्षणिक ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये शाळेतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांवर चर्चा केली आणि विचारांची देवाणघेवाण केली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या वैयक्तिक व बौद्धिक विकासाला चालना मिळाली. देवरुख येथे ‘ज्ञान द्या, संधी द्या’ या उपक्रमांतर्गत अनाथाश्रमामध्ये मुलींना पुस्तके भेट देण्यात आली. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी व प्राध्यापकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या मुलींशी वाचनसंवर्धनाविषयी संवाद साधण्यात आला, ज्यामुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. सुनील सोनावणे, मराठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा फाटक, , ग्रंथपाल श्री. सुभाष मायंगडे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. स्वप्ना पूरोहित, हिन्दी विभाग प्रमुख प्रा. स्नेहलता पुजारी, डॉ. प्रशांत नारगुडे, प्रा. पिया मोरे , ग्रंथालय सहाय्यक स्वप्नील कांगणे, रोशन गोरूले तसेच महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले. ‘पुस्तक आपल्या दारी’ उपक्रमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण करून त्यांचा बौद्धिक व वैयक्तिक विकास घडवण्यास हातभार लावला आहे. अशा उपक्रमांमुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळून ज्ञानाचा प्रसार व विकास होण्यास मोठी मदत होत आहे.
‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत ‘पुस्तक आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे शासकीय आस्थापनांना वाचनासाठी प्रेरणा
देवरुख: देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे- पित्रे स्वायत्त महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या राज्यव्यापी महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘पुस्तक आपल्या दारी’ उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत देवरुख पोलीस स्टेशन, तहसीलदार कार्यालय, आणि नगरपंचायत कार्यालयाला वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश संबंधित कर्मचारीवर्गाला वाचनाच्या माध्यमातून मानसिक शांती देणे आणि कामातील तणाव कमी करणे हा होता. पोलीस कर्मचारी अनेकदा तणावग्रस्त परिस्थितीत काम करत असल्याने वाचन त्यांच्यासाठी मानसिक विश्रांतीचे प्रभावी साधन ठरेल. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत उपलब्ध झालेल्या पुस्तकांमुळे त्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होऊन नवीन ज्ञान मिळवण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल. वाचनाच्या सवयीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी आपल्या भाषणात केले. प्रशासनातील दैनंदिन कामाच्या दबावातून बाहेर पडण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील कर्मचार्यांनी वाचनाचा स्वीकार केला. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत देण्यात आलेल्या पुस्तकांनी त्यांना ताजेतवाने होण्याची संधी दिली. वाचनाने विचारांच्या खुलासणीसोबतच ताणतणाव कमी करण्यास आणि नवीन दृष्टीकोन निर्माण करण्यास मदत होईल. ‘पुस्तक आपल्या दारी’ उपक्रमामुळे नगरपंचायत कार्यालयातील कर्मचार्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली. वाचनामुळे त्यांचा कामाचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला असून त्यांना मानसिक शांती आणि तणावमुक्तीचा अनुभव मिळाला आहे. वाचनाने त्यांच्या कामाच्या गुणवत्तेतही सकारात्मक बदल घडवून आणला आहे. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचा उद्देश संपूर्ण महाराष्ट्रात वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे आहे. याच अनुषंगाने ‘पुस्तक आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्यात आला. यामुळे केवळ वाचनाची गोडी वाढली नाही, तर मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि तणाव कमी करण्यास देखील मोठी मदत झाली आहे. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी उप-प्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल श्री. सुभाष मायंगडे, प्रा. अजित जाधव, ग्रंथालय सहाय्यक स्वप्नील कांगणे, रोशन गोरूले तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले. हा उपक्रम भविष्यात महाराष्ट्रातील इतर शासकीय कार्यालयांमध्येही राबविण्यात यावा अशी मागणी होत आहे. वाचन हे ज्ञानवर्धन आणि मानसिक समाधानासाठी महत्त्वाचे साधन असल्याचे या उपक्रमाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
वाचन संस्कृतीला बळकटी देणारा उपक्रम: प्राथमिक शिक्षकांची आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयास भेट
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयामध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट दिली. शिक्षकांना ग्रंथालयाचा मोफत प्रवेश (फ्री अॅक्सेस) देण्यात आला. यामुळे शिक्षकांनी संपूर्ण ग्रंथालयातील विविध विभागांची तपशीलवार पाहणी केली. त्यांनी ग्रंथालयातील कपाटांमधील पुस्तके आवडीने चाळून पाहिली तसेच काही जुनी व दुर्मिळ पुस्तके काळजीपूर्वक जतन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रदर्शनास संस्थेचे उपाध्यक्ष मा. कृष्णकुमार भोसले यांनी देखील भेट दिली. त्यांनी प्रदर्शनाची मांडणी व उपक्रमांचे कौतुक करत ग्रंथालयाच्या प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आयोजित पुस्तक व दिवाळी विशेषांक प्रदर्शनातील उत्कृष्ट मांडणी पाहून शिक्षक भारावून गेले. महाविद्यालयाचे ग्रंथपाल सुभाष मायंगडे यांनी उपस्थितांना ग्रंथालयातील विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी तसेच वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जातात. शिक्षकांनी महाविद्यालयाच्या वाचनसंस्कृती वृद्धीसाठी चाललेल्या प्रयत्नांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा देण्यासाठी राबवलेल्या या अभिनव उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व उप-प्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांचा लाभ मिळत आहे. ग्रंथपालांनी नमूद केले की, अशा उपक्रमांमुळे वाचन संस्कृतीला नवी दिशा मिळत आहे आणि विद्यार्थी व शिक्षक दोघांनाही अभ्यास व ज्ञानवृद्धीसाठी हे ग्रंथालय उपयुक्त ठरत आहे. ग्रंथालयाच्या यशस्वी उपक्रमांमागे ग्रंथालय सहाय्यक श्री. स्वप्नील कांगणे आणि श्री. रोशन गोरूले यांची मेहनत व समर्पण उल्लेखनीय आहे. त्यांनी ग्रंथालय व्यवस्थापन आणि प्रदर्शन मांडणीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.