Award of Autonomous Status by UGC, New Delhi (2019-20) | Star Education Award- 2023 | Best College Award- 2009-10 | Best Principal Award- 2022 | NAAC Accredited ‘A’ Grade (Third Cycle-2015-16) | Best College NSS Unit Award by MU (2015-16, 2022-23)| Jagar Janivancha Award (2012-13, 2013-14)

Devrukh Shikshan Prasarak Mandal’s

NYA. TATYASAHEB ATHALYE ARTS, VED. S. R. SAPRE COMMERCE &
VID. DADASAHEB PITRE SCIENCE COLLEGE, DEVRUKH (AUTONOMOUS)

Late Kakasaheb Pandit Educational Complex, Devrukh,
Tal. Sangameshwar Dist. Ratnagiri – 415 804 ( Maharashtra, India)

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्र” उपक्रमाचा शुभारंभ…

“वाचन संस्कृती व पुस्तक निवड” या कार्यशाळेत बोलताना प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी. एक तासाच्या सामूहिक वाचन सत्रात प्राचार्य, उप-प्राचार्य, प्राध्यापक वृंद आणि बहुसंख्य सहभागी विद्यार्थी   महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात नववर्षाच्या प्रारंभी करण्यात आला. वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करत तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला गती देणे आणि समाज प्रबोधन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. १ ते १५ जानेवारी दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या वाचन पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सामूहिक वाचन सत्र आणि “वाचन संस्कृती व पुस्तक निवड” या कार्यशाळेने झाली. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीच्या महत्त्वाबद्दल व कशाप्रकारे पुस्तक निवड करावी याबद्दल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात वाचनाच्या सवयीचे महत्त्व विशद केले. त्यांनी वाचनामुळे वैयक्तिक विकास कसा साधता येतो आणि त्याचा समाजावर कसा सकारात्मक प्रभाव पडतो, याचे मार्मिक विवेचन केले. यानंतर उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली आणि उपक्रमाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उप-प्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, भाषाविभाग प्रमुख डॉ. वर्षा फाटक, प्रा. स्नेहलता पुजारी, व प्रा. स्वप्ना पुरोहित, तसेच प्रा. अजित जाधव, प्रा. विकास शृंगारे यांसह महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत आयोजित १ तासाच्या सामूहिक वाचन सत्रात प्राचार्य, उप-प्राचार्य, प्राध्यापक वृंद आणि बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले. ग्रंथालयात आयोजित या वाचन सत्राने वाचन संस्कृतीचा प्रचार आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीस प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासासाठी आणि समाज प्रबोधनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने वाचन कौशल्य कार्यशाळा, ग्रंथालय भेट, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, वाचन संवाद, लेखक आपल्या भेटीला अंतर्गत नामांकित लेखकांची मुलाखती, पुस्तके आपल्या दारी अंतर्गत विविध गावामध्ये पुस्तकांचे प्रदर्शन, स्थानिक तहसीलदार, पोलीस स्थानक, व नगरपंचायत येथील प्रशासकीय अस्थापनाना च्या निगडीत पुस्तके वाचण्यास देऊन वाचन संस्कृतीस बळकटी आणण्यास प्रयत्न करण्यात येणार आहे. याकरिता ग्रंथालय कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी प्रतिनिधी सहकार्य करणार आहेत. याशिवाय ग्रंथ व दिवाळी विशेषांक प्रदर्शन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक गोकुळ अनाथाश्रमातील विद्यार्थिनी यांसी पुस्तक भेट देऊन वाचन संवाद साधणार आहे.  यांसारख्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रंथपाल  प्रा. सुभाष मायंगडे यांनी दिली.  या वाचन संकल्प पंधरवडा आयोजनासाठी उप- प्राचार्य डॉ. सरदार पाटील , ग्रंथपाल  प्रा. सुभाष मायंगडे , मराठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा फाटक, हिंदी विभाग प्रमुख प्रा. स्नेहलता पुजारी, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. स्वप्ना पुरोहित, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. सुनिल सोनावणे, आणि मराठीचे प्रा. अजित जाधव तसेच ग्रंथालय कर्मचारी स्वप्नील कांगणे व रोशन गोरुले यांचे विशेष योगदान लाभले आहे. या वाचन पंधरवड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि त्यांना वाचन संस्कृतीशी जोडणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

जयवंत दळवी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत देवरुख महाविद्यालयाच्या साक्षी गवंडी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

देवरुख- राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ओणी आयोजित १०वी जयवंत दळवी राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाची ‘हीरो नंबर वन’ ही एकांकिका सहभागी झाली होती. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या एकांकिकेतील कु. साक्षी मधुकर गवंडी हिच्या अलका या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. ‘हीरो नंबर वन’ या एकांकिकेचे लेखन सागर माने यांनी केले असून, तर दिग्दर्शन सागर माने आणि विक्रांत सामंत यांनी केले आहे. या नाटकामध्ये साक्षी गवंडीसह साहिल खेडस्कर, वैष्णवी साळवी, अफान धामस्कर, तनुजा जठार, केतन कदम, केतकी शेलार, अथर्व पवार, किंजलबेन रैयानी, संकेत जाधव, संग्राम गुरव, रुही गोताड या विद्यार्थी कलाकारांचा सहभाग आहे. या एकांकिकेने राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन रायसोनी चषक व पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठीही यापूर्वी पात्रता प्राप्त केली आहे. साक्षी गवंडी हिने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त केला होता. साक्षी गवंडी हिने दोन वेळा मिळवलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या एकांकिकेतील विद्यार्थी कलाकारांचे अभिनंदन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘हीरो नंबर वन’ या एकांकिकेचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. यावेळी साक्षी गवंडी आणि सर्व विद्यार्थी कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नाटकाच्या उत्तम सादरीकरणासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी नाटकाच्या संपूर्ण टीमला रोख ₹ १०,०००/- विशेष बक्षीस देऊन गौरविले. एकांकिका संपल्यानंतर संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून मार्गदर्शन केले. यावेळी संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विकास शृंगारे, प्रा. धनंजय दळवी, प्रा. अक्षय पेठकर, प्रा. सानिका भालेकर, प्रा. चैत्राली कदम आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

आठल्ये-सप्रे- पित्रे’च्या विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक फनी गेम्स आणि फिशपॉडद्वारे लुटला मनमुराद आनंद

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात मनोरंजनात्मक फनी गेम्स आणि फिशपॉडद्वारे विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. फनी गेम्स कार्यक्रमाचे उद्घाटन यावर्षीच्या स्नेहसंमेलनाच्या प्रमुख समन्वयक प्रा. सुवर्णा साळवी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, फनी गेम्स समन्वयक प्रा. प्रवीण जोशी, विद्यार्थी विद्यापीठ प्रतिनिधी सुयोग रहाटे, विद्यार्थी स्वराज्य मंडळ सचिव स्नेहा शेट्ये, विद्यार्थी स्वराज्य मंडळ सदस्य, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. फनी गेम्स उपक्रमामध्ये विविध मनोरंजनात्मक, बुद्धिवर्धक आणि संयमाची कसोटी पाहणारे विविध खेळ विद्यार्थ्यांनी आयोजित केले होते. यामध्ये संगीत खुर्ची, बॉलने ग्लास पाडणे, स्ट्रॉने थर्माकोलचे गोळे उचलणे, फळ्यावरील गाढवाच्या चित्राला शेपूट लावणे, एका काडीने मेणबत्ती पेटवणे, बादलीत बॉल टाकने, ग्लास मनोरा, डोळे बांधून काठीने मडके फोडणे, मेमरी गेम्स, अभिनयावरून चित्रपटाचे नाव ओळखणे, बादलीत नाणे टाकने, लाईनमधील बॉल पासिंग शर्यत, फुगे फोडणे, स्टिक रिंग, शब्दावरून गाणी ओळखणे, चमच्याने बाटलीत पाणी भरणे आणि नो रिॲक्शन अशाप्रकारच्या खेळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कॅन्टीन उपक्रमाला सर्वांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थांसोबत, भारताच्या विविध प्रांतातील तसेच परदेशात नावाजलेले विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ तयार करून खवय्यांना तृप्त केले. फनी गेम्सच्या समापनानंतर विद्यार्थ्यांचा आवडता फिशपॉड अर्थात शेलापागोटे कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. सुवर्णा साळवी यांनी केले. यानंतर प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी मार्गदर्शन केले. वाचिक आणि संगीतमय फिशपॉडना विद्यार्थ्यांनी टाळ्या, शिट्ट्या आणि जोरदार आवाजात प्रतिसाद दिला. दोन सर्वोत्कृष्ट फिशपॉडची निवड करण्यात आली आणि त्या दोन विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी सन्मानित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अजित जाधव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही समितीतील प्राध्यापक व विद्यार्थी सदस्य, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

जैवविविधता बोर्डकडून २८ लाख ५० हजाराचे अनुदान

प्रा. डॉ. नाईकवाडे करणार संशोधन ; रानभाज्या, जंगली फळांचा अभ्यास देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या “आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख  प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांना महाराष्ट्र राज्य जैवविविधता अभ्यासासाठी २८ लाख ५० हजार  रुपये अनुदान संशोधन प्रकल्पासाठी मंजूर झाले आहे. या संशोधनाचा उद्देश रानभाज्या व जंगली फळांच्या पोषणमूल्याचा तसेच औषधी गुणधर्मांचा सखोल अभ्यास करून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध करून देणे आहे. या प्रकल्पात कोकणातील रानभाज्या आणि जंगली फळे यांचे पोषण मूल्य, उपलब्धता, औषधी गुणधर्म, आर्थिक संधी यावर संशोधन होणार आहे. या संशोधनाचा कालावधी तीन वर्षे आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत हा एकमेव प्रकल्प मंजूर झालेला आहे. आठवडाभरापूर्वी महाविद्यालयाच्या स. का. पाटील संशोधन केंद्रामधून विज्ञान विषयातील पहिली विद्यावाचस्पती पदवी डॉ. अनिल निकम यांनी रसायन शास्त्र विषयात मिळवली. त्यांच्या यशानंतर लगेचच वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. नाईकवाडे यांना  महाराष्ट्र राज्य जैवविविधता अभ्यासासाठी २८ लाख ५० हजार  रुपये अनुदान संशोधन प्रकल्पासाठी मंजूर झाले आहे. ही गोष्ट अभिमानास्पद यश आहे. डॉ. नाईकवाडे यांच्या या प्रकल्पाद्वारे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल. या अभ्यासातून स्थानिक प्रजातींचे महत्त्व समजून घेतले जाईल व त्यांचा उपयोग समाजासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. संशोधनाद्वारे औषधी व पोषणमूल्य असलेल्या वनस्पतींचा वापर कसा करता येईल, यावर विशेष भर दिला जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला हातभार लागेल. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा आहे. या अनुदानामुळे संशोधनाच्या क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होणार असून डॉ. नाईकवाडे यांच्या प्रकल्पामुळे स्थानिक जैवसंपत्तीचा अभ्यास अधिक प्रमाणात होईल. या संशोधन प्रकल्पातून भविष्यात कोकणातील शेतकरी व बागायतदाराना लाभ होऊ शकणार आहे. डॉ. नाईकवाडे  यांच्यासारखे संशोधक-प्राध्यापक निर्माण करून कोकण विकासाला चालना मिळावी यासाठी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ कटिबद्ध आहे. डॉ. नाईकवाडे  यांचे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने अध्यक्ष मा. श्री. सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिनंदन केले आहे.

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनास प्रारंभ

 फोटो- १. मुलांच्या क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपस्थित शिक्षक व विद्यार्थी.             २. मुलांच्या खो-खो सामन्याचे उद्घाटन करताना उपप्राचार्य डॉ. पाटील, उपस्थित शिक्षक व विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन ही आनंदाची पर्वणी असते. स्वतःला विविध कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमात सिद्ध करण्यासाठी ही घरची संधी असते. यातूनच विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असते. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असणाऱ्या क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या खोखो आणि क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्याचे विधिवत उद्घाटन प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी, तर मुलांच्या खो-खो स्पर्धेतील पहिल्या सामन्याचे उद्घाटन  उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी श्रीफळ वाढवून केले. यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा शपथ कनिष्ठ विभागाच्या जिमखाना प्रमुख प्रा. सानिका भालेकर यांनी दिली. यावेळी वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख समन्वयक प्रा. सुवर्णा साळवी, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना समन्वयक प्रा. सानिका भालेकर, प्रा. डॉ. अमित वराळे, क्रीडा शिक्षक प्रा. सागर पवार, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. सुनील वैद्य, प्रा. स्वप्नाली झेपले, कनिष्ठ महाविद्यालयाची जी.एस. स्नेहा शेट्ये, क्रीडाविभाग प्रतिनिधी श्रीदीप करंडे, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलनातील क्रीडा महोत्सवात विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी खो-खो, कबड्डी हॉलीबॉल व रस्सीखेच या सांघिक खेळांसह कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन या वैयक्तिक खेळातील एकेरी व दुहेरी स्पर्धा, तसेच मैदानी स्पर्धेमध्ये धावणे, उडीचे प्रकार, फेकीचे प्रकार, तसेच धावण्याच्या रीले स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील वार्षिक क्रीडा स्पर्धा १७ ते २१ डिसेंबर या कालावधी संपन्न होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक, बुद्धीला चालना देणारे, वैविध्यपूर्ण सादरीकरणाला प्रोत्साहन देणारे वेगवेगळे ‘डेज’ महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहेत. क्रीडा स्पर्धा आणि ‘डेज’च्या समापनानंतर विद्यार्थ्यांसाठी दिंडी, सत्यनारायणाची पूजा, ट्रॅडिशनल डे, विविध गुणदर्शन कार्यक्रम, अल्पोपहार, फनी गेम, फिश पॉन्ड आणि म्युझिक पॉन्ड यांची मेजवानी असणार आहे. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या नियोजनानुसार सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वराज्य मंडळातील सदस्य वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.    

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ‘भारतीय नौदल दिन’ आनंददायी वातावरणात साजरा

फोटो- शहीद स्मारक स्थळी अभिवादन करताना नेव्हल एनसीसी युनिटचे पदाधिकारी व कॅडेट्स. छत्रपती शिवाजी महाराजांनी १७व्या शतकात आरमाराचे युद्धकालीन महत्त्व ओळखून योजनाबद्ध आरमाराची बांधणी केली आणि तत्कालीन सागरी सीमेचे संरक्षण करण्याची तजवीज केली. शिवरायांचे हे भारतीय इतिहासातील आगळे वेगळे कर्तुत्व आहे, यासाठीच छत्रपती शिवरायांना भारतीय नौसेनेचे आद्य प्रवर्तक मानतात. या आठवणींना उजाळा मिळण्याची निमित्त होते, ते म्हणजे देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या भारतीय नौदल दिनाचे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद स्मारक स्थळी २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसी, रत्नागिरीचे इन्स्ट्रक्टर हेमंत सायनी, सहकारी अजिंक्य देवळेकर, महाविद्यालयाच्या नेव्हल एनसीसी युनिटचे सब लेफ्टनंट प्रा. उदय भाट्ये आणि एनसीसी युनिटच्या ५०  कॅडेटनी मानवंदना दिली. यानंतर हेमंत सायनी आणि प्रा. उदय भाट्ये यांनी उपस्थित कॅडेटना मार्गदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा. सीमा शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना ‘भारतीय नौदलातील स्त्रीशक्ती’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. शेट्ये यांनी ब्रिटिश राजवटीत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्त्रियांच्या सक्रिय सहभागा आढावा घेतला. दुसऱ्या महायुद्धातील आझाद हिंद फौजेतील राणी झाशी रेजिमेंट मधील महिला सैनिकांचे कार्यकर्तृत्व विशद केले. नौदलात स्त्री कमांडर ही रँक पहिल्यांदा मिळवणाऱ्या डॉ. बार्बरा घोष, सब लेफ्टनंट शुभांगी स्वरूप, व्हॉइस ऍडमिरल सर्जन शैला मथाई, लेफ्टनंट नवज्योत कौर, लेफ्टनंट करिष्मा शिरवळे, लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थळी यांची यशस्वी कारकीर्द उपस्थितितांसमोर मांडली. नौदलातील कार्यरत महिलांच्या विविध नाविक सागरी परिक्रमाबाबतची माहितीही याप्रसंगी दिली. प्रा. धनंजय दळवी यांनी ‘नौदलाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर माहिती देताना, भारतीय नौदलाचा इतिहास व महत्त्व, नौदलाची स्थापना, नौदलाचे ब्रीदवाक्य, भारतीय नौदलाचे  तळ व फ्लिटस स्टेशन्स यावर प्रकाश टाकला. भारतीय नौदल दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना, सद्यस्थितीतील नौदलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक शस्त्रसज्ज युद्धनौका व पाणबुड्या, कर्मचारी संख्याबळ, नौदलाची अलीकडच्या काळातील आत्मनिर्भरता याबाबतचा सविस्तर आढावा घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनाला संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, राहुल फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.  

आठल्ये-सप्रे-पित्रे’च्या ‘हीरो नंबर वन’ एकांकिकेचे चमकदार यश

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुखच्या ‘हिरो नंबर वन’ या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडक व रायसोनी करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत यश प्राप्त करून चमकदार कामगिरी केली आहे. या एकांकिकेचे लेखन सागर माने यांनी केले असून, दिग्दर्शन सागर माने आणि विक्रांत सामंत यांनी केले आहे. महाराष्ट्र कलोपासक मंडळ, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा-२०२४ मधील कोकण विभागीय प्राथमिक फेरीत या एकांकिकेने द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. त्याचबरोबर या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कु. साक्षी गवंडी हिला सन्मानित केले गेले. पुरुषोत्तम करंडकची अंतिम स्पर्धा पुणे येथे संपन्न होणार आहे. तर रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या रायसोनी करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा-२०२४ मधील प्राथमिक फेरीत महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त करून नागपूर येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. ‘हीरो नंबर वन’ या एकांकिकेमध्ये सहभागी असणारे महाविद्यालयाचे विद्यार्थी कलाकार  पुढीलप्रमाणे:- साहिल खेडस्कर, वैष्णवी साळवी, अफान धामस्कर, तनुजा जठार, केतन कदम, साक्षी गवंडी, केतकी शेलार, अथर्व पवार किंजलबेन रैयानी, संकेत जाधव, संग्राम गुरव, रुही गोताड. या एकांकिकेसाठी प्रकाश योजना साहिल चव्हाण यांनी तर पार्श्वसंगीत आयुष जाधव यांनी दिले आहे. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. अक्षय पेठकर आणि प्रा. ओंकार पारकर यांनी जबाबदारी सांभाळली. महाविद्यालयाच्या एकांकिकेला मिळालेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक समन्वयक प्रा. विकास शृंगारे आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.