Award of Autonomous Status by UGC, New Delhi (2019-20) | Star Education Award- 2023 | Best College Award- 2009-10 | Best Principal Award- 2022 | NAAC Accredited ‘A’ Grade (Third Cycle-2015-16) | Best College NSS Unit Award by MU (2015-16, 2022-23)| Jagar Janivancha Award (2012-13, 2013-14)

Devrukh Shikshan Prasarak Mandal’s

NYA. TATYASAHEB ATHALYE ARTS, VED. S. R. SAPRE COMMERCE &
VID. DADASAHEB PITRE SCIENCE COLLEGE, DEVRUKH (AUTONOMOUS)

Late Kakasaheb Pandit Educational Complex, Devrukh,
Tal. Sangameshwar Dist. Ratnagiri – 415 804 ( Maharashtra, India)

पुस्तके दान मोहीम

कोणत्या प्रकारची पुस्तके आपण ग्रंथालयास देणगी म्हणून देऊ शकता? जुनी किंवा नवीन, सुस्थितीत असलेली दर्जेदार पुस्तके (ग्रंथालयासाठी उपयुक्त). नावाजलेल्या लेखकांची अवांतर वाचनाची पुस्तके. उदा. कथा, कादंबरी, प्रवास वर्णने, चरित्रे- आत्मचरित्रे इत्यादी.. शैक्षणिक आणि मार्गदर्शक पुस्तके (स्पर्धा परीक्षांसाठी). व्यक्तिमत्व विकास, नोकरी मार्गदर्शन, तसेच प्रेरणादायी विषयांची पुस्तके. विज्ञान, इतिहास, तंत्रज्ञान इत्यादी विषयांवरील पुस्तके कृपया तुमचे देणगी स्वरूपातील दर्जेदार पुस्तके आजच आमच्या ग्रंथालयात जमा करा आणि या कार्यात सहभागी व्हा. टीप: देणगी स्वरूपातील पुस्तकांचे परीक्षण ग्रंथालय सल्लागार समितीमार्फत करण्यात येईल, आणि उपयुक्त असे दर्जेदार पुस्तकेच ग्रंथालयात दाखल करण्यात येतील. दिनांक : ०९- १५ ऑक्टोबर २०२४ सकाळी १०:३०-५.०० वाजेपर्यंत स्थळ : ग्रंथालय, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख धन्यवाद ! Read Notification Click Here

पुस्तक परीक्षण स्पर्धा (Book Review Competition)- २०२४-२५

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालय व मराठी विभागाच्या वतीने पुस्तक परीक्षण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले पुस्तक परीक्षण १३ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जमा करावेत. स्पर्धेचे नियमः कोणत्याही एका मराठी पुस्तकाचे परीक्षण करावे. यामध्ये चरित्र-आत्मचरित्र, कथा, कादंबरी व प्रेरणात्मक पुस्तकांचे परीक्षण करू शकता. स्पर्धेचे माध्यमः मराठी, हिंदी किंवा इंग्रजी पैकी कोणतेही परीक्षण शब्द मर्यादा १०००-१५०० शब्द परीक्षण हस्ताक्षरात किंवा google/Unicode font मध्ये टाइप करून देऊ शकता. आपले परीक्षण दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ पर्यन्त ग्रंथालयात जमा करावेत. प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ प्राप्त विद्यार्थ्यांना आकर्षक परितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहिती करिताः ग्रंथपाल श्री. सुभाष एस. मायंगडे मोब. नं. ९८६०५७२७९७ प्रा. अजित ज. जाधव (मराठी विभाग) मोब. नं. ९८६०७६७९२८

आठल्ये-सप्रे-पित्रे’ला मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवातील ‘फाईन आर्ट’मध्ये दोन पारितोषिके

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालय, देवरुखच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ५७व्या युवा महोत्सवाच्या अंतिम स्पर्धेत रांगोळी व मेहंदी डिजाइन या दोन फाईन आर्ट प्रकारात पारितोषिके प्राप्त करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे. रांगोळी या कलाप्रकारात सायली संतोष शिवगण(तृतीय वर्ष, संगणक विज्ञान) हिने स्पर्धेत प्रथमच सहभागी होऊन ‘पारंपारिक भौमितिक रांगोळी’ प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले, तर सिद्धी लवू शिंदे(प्रथम वर्ष, कला) हिने वैष्णवी वैभव सुर्वे(तृतीय वर्ष, विज्ञान) हीच्या हातावर ‘वधू मेहंदी’ रेखाटून कॉन्सोलेशन पारितोषिक प्राप्त केले. या दोन्ही स्पर्धेसाठी व्यवस्थापक म्हणून विलास रहाटे व प्रा. प्रज्ञा शिंदे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींना कलाशिक्षक सुरज मोहिते, विलास रहाटे व प्रा. धनंजय दळवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक समन्वयक प्रा. विकास शृंगारे, तसेच सहकारी प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.    फोटो- यशस्वी सायली शिवगण आणि सिद्धी शिंदे यांच्या कलाकृती

आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे- पित्रे स्वायत्त महाविद्यालयात नुकत्याच संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर, दिनांक १९ व २० सप्टेंबर, २०२४ रोजी आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा ही महाविद्यालयामध्ये प्रथमच होत असून, महाविद्यालयाच्या सुलभाताई आपटे क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे. आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व कोकण या चार विभागांतील विद्यार्थी आपापल्या विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेसाठी मुंबई  विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी उपस्थित राहणार आहेत. सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी तांत्रिक सहाय्य संगमेश्वर तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई आणि सहकारी यांचे लाभणार आहे. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या मार्गदर्शन व नियोजना नुसार उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, जिमखाना समन्वयक प्रा. डॉ. अमित वराळे आणि सहकारी प्राध्यापक मेहनत घेत आहेत.

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन

देवरुख नगरातील आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात दिनांक १४ व १५ सप्टेंबर २०२४ रोजी आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेच्या आयोजनाचे हे सलग तिसरे वर्ष असून सदरची स्पर्धा महाविद्यालयाच्या सुलभाताई आपटे क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे. आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील 200 पेक्षा अधिक विद्यार्थी सदर स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने सुसज्ज अशा सुलभाताई आपटे क्रीडा संकुलाची निर्मिती केली आहे. सुलभाताई आपटे क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज असल्याने मुंबई विद्यापीठामार्फत सलग तिसऱ्या वर्षी कोकण विभागीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी दिली आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले. सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संगमेश्वर तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे उत्तम सहकार्य लाभत आहे. सदर स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन संगमेश्वर तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने श्री मंगेश प्रभुदेसाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दिले आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील जिमखाना प्रमुख डॉ अमित वराळे आणि जिमखाना समितीतील सदस्य प्रा. चन्नय्या हिरेमठ, डॉ राहुल ठोके, प्रा प्रतीक लिंगायत, प्रा शुभम डाफळे, प्रा अजित देवळे, प्रा हेमांगी आग्रे, प्रा पिया मोरे, प्रा देवेश जोग आणि महाविद्यालयातील विविध खेळांमध्ये सक्रिय असणारे विद्यार्थी उत्साह पूर्ण वातावरणात तयारी करत आहेत, महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सलग तिसऱ्या वर्षी विद्यापीठाच्या विभाग स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करत असल्याबद्दल जिमखाना विभागाचे विशेष अभिनंदन केले. डॉ तेंडोलकर पुढे म्हणाले की या स्पर्धेमुळे देवरुख परिसरातील विद्यार्थ्यांना बॅडमिंटन खेळाकडे निश्चितपणे आकर्षित केले जाईल आणि हा खेळ तळागळापर्यंत रुजण्यास मदत होईल. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सदानंदजी भागवत, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री कृष्णकुमार भोसले, संस्थेचे कार्यवाह माननीय श्री शिरीषजी फाटक आणि संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सदर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आठल्ये-सप्रे- पित्रे’ मध्ये ‘अस्पीरंट्स’ या अंकाचा प्रकाशन सोहळा उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाच्या इंग्लिश विभागाच्या ‘अस्पीरंट्स’ या अंकाचा प्रकाशन सोहळा प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीया कांबळे व मिताली कांबळे या द्वितीय वर्ष, कला वर्गातील विद्यार्थीनीनी खुमासदार पद्धतीने केले. प्रास्ताविकात प्रा. स्वप्ना पुरोहित यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाबरोबर इंग्लिश भाषेच्या प्रात्यक्षिक अनुभवाद्वारे इंग्लिश भाषेवर प्रभुत्व अवगत करता येण्यासाठी, तसेच इंग्लिश भाषा कार्यात्मक पद्धतीने समजून व त्यातून प्रात्यक्षिक अनुभव मिळणार असल्याचे स्पष्ट केले. आधुनिक प्रसार माध्यमांसाठी आवश्यक असणारी विविध कला व कौशल्यांची ओळख या उपक्रमातून होणार असल्याची माहिती प्रा. पुरोहित यांनी दिली. नवीन शैक्षणिक धोरणांनुसार हा उपक्रम राबवला गेला असून प्रथम व द्वितीय वर्ष, कला वर्गातील विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील घडामोडींसह देवरुख शहराच्या सभोवतालच्या महत्वाच्या घटना, कथा, लेख आणि बातम्यांचा अंकात समावेश आहे. या अंकासाठी आवश्यक माहिती गोळा करताना आलेले अनुभव श्वेता वणकुंद्रे, जीनत जेठी आणि राखी वैद्य या प्रथम वर्ष, कला वर्गातील विद्यार्थिनींनी उपस्थितां समोर कथन केले. या अंकासाठी मेहनत घेणाऱ्या प्रथम वर्ष, कला वर्गातील विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी जीवनातील सहकार्य, संज्ञापन (संवाद) आणि समन्वय यांचे महत्त्व आणि उपयुक्तता याबाबत सविस्तर विवेचन केले. समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विकास शृंगारे यांनी प्रदर्शित अंक व विद्यार्थ्यांच्या साहित्य विषयीचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाला कौतुकाची थाप दिली. वैविध्यपूर्ण इंग्रजी साहित्याचे वाचन, मनन व चिंतनाचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात व अभ्यासात असणारे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन केले. इंग्रजी भाषा व साहित्य यामध्ये विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या करिअरच्या विविध संधी याप्रसंगी विशद केल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. स्वप्ना पुरोहित यांनी केले. या सोहळ्याला इंग्रजी विभागातील ४० विद्यार्थ्यांसह बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. Published News sources: ‘आठल्ये-सप्रे-पित्रे’ मध्ये ‘ॲस्पीरंट्स’ या अंकाचा प्रकाशन सोहळा उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न. ‘आठल्ये-सप्रे-पित्रे’ मध्ये ‘ॲस्पीरंट्स’ या अंकाचा प्रकाशन सोहळा उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न देवरूख महाविद्यालयात ‘ॲस्पीरंट्स’ या अंकाचा प्रकाशन सोहळा उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न

देवरुख महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तीन पुरस्कार

  देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे- पित्रे  महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या तीन पुरस्कारांमध्ये महाविद्यालयाला ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुरस्कार’, तसेच महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनिल रत्नाकर सोनावणे यांना ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पुरस्कार’ आणि कु. जानवी रणधीर शिंदे या विद्यार्थिनीला ‘राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. ▪️राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या तीन पुरस्काराच्या निकषासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षात मुंबई विद्यापीठ, राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत निर्देशित केलेले उपक्रम व त्यांची अंमलबजावणी, तसेच इतर समाजोपयोगी कार्यक्रम व उपक्रमांच्या आधारावर हे पुरस्कार मुंबई विद्यापीठांनी बहाल केले आहेत. ▪️महाविद्यालयाला यापूर्वी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ करीता ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुरस्कार’, तसेच प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांना ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्राप्त झाला होता. ▪️महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे तीन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनील सोनावणे आणि विभागातील कार्यरत प्रा. अनिकेत ढावरे, प्रा. डॉ. प्रशांत नारगुडे आणि प्रा. पिया मोरे यांना सन्मानित केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाला मिळालेल्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड वेदा प्रभुदेसाई, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. E-papers News Link: https://digikokan.com/devrukh-college-received-three-awards-from-the-department-of-national-service-scheme-university-of-mumbai/kokan/ https://ratnagiri24news.com/devrukh-college-received-three-awards-from-the-department-of-national-service-scheme-university-of-mumbai/ https://www.graminvarta.in/?p=17733

देवरुख महाविद्यालयात प्रा. नीलम आखाडे यांचा सत्कार संपन्न

  देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे-पित्रे वरिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागात कार्यरत असणाऱ्या प्रा. नीलम नारायण आखाडे यांना सेट परीक्षेतील यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सन्मानित केले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. विकास शृंगारे, प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नीलम आखाडे यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून ‘ए’ ग्रेड मधून उत्तीर्ण केले आहे. नीलम यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा,आंबवली(धनगरवाडी) येथे, तर माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यामंदिर, ताम्हाणे येथे आणि उच्च माध्यमिक शिक्षण गुरुवर्य काकासाहेब सप्रे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. त्यांचे वडील नारायण आखाडे जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असून, आई सौ. सुवर्णा या गृहिणी आहे. नीलम आखाडे भौतिकशास्त्र या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या महाविद्यालयाच्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत. त्यांना प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, प्रा. डॉ. मीरा काळे, प्रा. उदय भाट्ये, प्रा. प्रशांत जाधव, प्रा. अनिकेत ढावरे, प्रा.पुष्कर पाटकर आणि ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. प्रा. आखाडे यांनी प्राप्त केलेल्या यशासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, तसेच विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.       E-papers Link: https://dakhalnewsmaharatshtra.com/?p=13526

‘कारगिल विजय दिवस’ रौप्य महोत्सवानिमित्ताने ‘परमवीर प्रश्नमंजुषा’ स्पर्धेचे आयोजन

कारगिल युद्ध ३ मे ते २६ जुलै १९९९ या कालावधीत लडाख जिल्ह्यातील द्रास, कारगिल या ठिकाणी झाले होते.दोन महिने, तीन आठवडे आणि दोन दिवस जगातल्या सर्वांत उंचीवरच्या भूमीत लढल्या गेलेल्या युद्धाला आणि त्यात मिळविलेल्या नेत्रदीपक विजयाला यावर्षी पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत. प्राणांची बाजी लावून भारतीय जवानांनी या युद्धात 26 जुलै 1999 रोजी विजयश्री खेचून आणली आणि ऑपरेशन विजय यशस्वी झाले. हा शुभदिनी सर्व देश ‘कारगिल विजय दिन’ म्हणून साजरा करतो. देशांच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी अहोरात्र धीरोदात्तपणे लढणाऱ्या सैनिकांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण राहावे म्हणून यानिमित्ताने ‘परमवीर चक्र विजेत्या सैनिकांची शौर्यगाथा’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे 1. वक्तृत्व स्पर्धेचा विषय:- परमवीर चक्र विजेत्या सैनिकांची शौर्यगाथा 2. वेळ 5 ते 7 मिनिटे 3. स्पर्धा दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता कै. द. ज. कुलकर्णी सभागृहात होईल. 4. इयत्ता 10वी ते 15 वी तील विद्यार्थी यामध्ये सहभाग घेऊ शकतात. 5. जे विद्यार्थी सदर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छितात त्यांनी आपली नावे शाळेचे नाव व इयत्तेसह खालील नंबरवर पाठवावीत. 6. विजेत्यांना आकर्षक बक्षिस व प्रमाणपत्र दिले जाईल. 7. वक्तृत्व स्पर्धेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे प्रा. अजित जाधव 986-076-7928 वा श्री.सुभाष माईंगडे- 9860572797 यांचेकडे नोंदवावीत. आयोजक: देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे, आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय,देवरुख

आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी कलाकारांचा सन्मान सोहळा उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न….

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालय (स्वायत्त), देवरुखमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मधील मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवातील विविध सांस्कृतिक कलाप्रकारात यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्वर्गीय स. का. पाटील सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. ओंकार पारकर यांनी केले. ■ प्रा. धनंजय दळवी यांनी ५६व्या व ५७व्या युवा महोत्सवात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. ■ यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले मुंबई विद्यापीठाचे फाईन आर्टचे सर्वसाधारण विजेतेपद, महाविद्यालयाला लोकनृत्य प्रकारात प्राप्त झालेला विशेष चषक, तसेच राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात महाविद्यालयाच्या अक्षय शिवाजी वहाळकर आणि सुयोग चंद्रकांत रहाटे यांनी मिळवलेले यश. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री. विलास रहाटे यांनी मुंबई विद्यापीठाचे मार्गदर्शक म्हणून मिळवलेले यश यांचा समावेश होता.   ■ सन्मानित करण्यात आलेले विद्यार्थी आणि त्यांचा सहभाग असणाऱ्या स्पर्धा पुढील प्रमाणे:- शैक्षणिक वर्ष: २०२४-२५ मधील ५७ वा मुंबई विद्यापीठ युवा महोत्सव रत्नागिरी जिल्हा दक्षिण विभाग- १० मध्ये महाविद्यालयाने यशस्वी कामगिरी करून अंतिम स्पर्धेसाठी १४ कला प्रकारात प्रवेश प्राप्त केला आहे. यातील यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणेः ■ १. भारतीय सुगम संगीत- ब्रिद संस्कृती- प्रथम. ■ २. लोकनृत्य- सहभाग १० कलाकार- प्रथम. ■ ३. कार्टूनिंग- रहाटे सुयोग- *प्रथम ■ ४. कोलाज- रहाटे सुयोग- द्वितीय. ■ ५. क्ले मॉडलिंग- रहाटे सुयोग- तृतीय. ■ ६. मेहंदी- शिंदे सिद्धी व सुर्वे वैष्णवी- द्वितीय. ■ ७. पोस्टर मेकिंग – मोवळे साहिल – द्वितीय. ■ ८. रांगोळी – शिवगण सायली- कन्सोलेशन. ■ ९. कथाकथन (मराठी)- चव्हाण श्रुती- द्वितीय. ■ १०. एकपात्री अभिनय (हिंदी)- साळवी वैष्णवी – द्वितीय. ■ ११. एकपात्री अभिनय (मराठी)-खेडस्कर साहिल – द्वितीय. ■ १२ शास्त्रीय नृत्य- अवसरे शर्वरी- द्वितीय. ■ १३. कथाकथन (हिंदी)- चव्हाण तनया- तृतीय. ■ १४. मिमिक्री- गवंडी साक्षी- कन्सोलेशन. ■ ५६व्या मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवातील लोकनृत्य प्रकारासाठी महाविद्यालयाला ‘श्रीमती इंदुमती लेले पुरस्कार’ हा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये साक्षी गवंडी, साक्षी बडबे, साक्षी कांबळे, आकांक्षा ननावरे, प्रीती पाष्टे, नम्रता नलावडे, वैष्णवी भोसले, सायली मोरे आणि मार्गदर्शकांना समावेश आहे.   ■ ५६व्या युवा महोत्सवातील ‘फाईन आर्टचे (उपयोजित कला)’ स्वर्गीय गणेश प्रभाकर गांगल चषक महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचे सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करून देण्यात यशस्वी झालेल्या सुयोग रहाटे, अक्षय वहाळकर, सिद्धी शिंदे, आणि मार्गदर्शकांना सन्मानित करण्यात आले.   ■ मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षय वहाळकर व सुयोग रहाटे यांना इंद्रधनुष्य राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सव, पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ युवा महोत्सव, राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवातील उत्तम कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाचे फाईन आर्टचे मार्गदर्शक श्री. विलास रहाटे यांनाही सन्मानित करण्यात आले.   ■ प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना फाईन आर्ट प्रकारात महाविद्यालयाने मिळवलेल्या नावलौकिक अभिमानास्पद असल्याचे नमूद केले. कोणत्याही कलेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कायम वाचन, सराव, निरीक्षण, मनन व चिंतन करण्याबाबत आग्रही मत व्यक्त केले.   ■ कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा. विकास शृंगारे यांनी केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य सरदार पाटील, प्रा. डॉ. प्रताप नाईकवाडे, मार्गदर्शक, विद्यार्थी व पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.   ■ विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, अड. वेदा प्रभुदेसाई यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.