देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुखच्या ‘हिरो नंबर वन’ या एकांकिकेने पुरुषोत्तम करंडक व रायसोनी करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत यश प्राप्त करून चमकदार कामगिरी केली आहे. या एकांकिकेचे लेखन सागर माने यांनी केले असून, दिग्दर्शन सागर माने आणि विक्रांत सामंत यांनी केले आहे.
महाराष्ट्र कलोपासक मंडळ, पुणे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा-२०२४ मधील कोकण विभागीय प्राथमिक फेरीत या एकांकिकेने द्वितीय पारितोषिक प्राप्त केले. त्याचबरोबर या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कु. साक्षी गवंडी हिला सन्मानित केले गेले. पुरुषोत्तम करंडकची अंतिम स्पर्धा पुणे येथे संपन्न होणार आहे. तर रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या रायसोनी करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा-२०२४ मधील प्राथमिक फेरीत महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक प्राप्त करून नागपूर येथे होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे.
‘हीरो नंबर वन’ या एकांकिकेमध्ये सहभागी असणारे महाविद्यालयाचे विद्यार्थी कलाकार पुढीलप्रमाणे:- साहिल खेडस्कर, वैष्णवी साळवी, अफान धामस्कर, तनुजा जठार, केतन कदम, साक्षी गवंडी, केतकी शेलार, अथर्व पवार किंजलबेन रैयानी, संकेत जाधव, संग्राम गुरव, रुही गोताड. या एकांकिकेसाठी प्रकाश योजना साहिल चव्हाण यांनी तर पार्श्वसंगीत आयुष जाधव यांनी दिले आहे. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. अक्षय पेठकर आणि प्रा. ओंकार पारकर यांनी जबाबदारी सांभाळली.
महाविद्यालयाच्या एकांकिकेला मिळालेल्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, सांस्कृतिक समन्वयक प्रा. विकास शृंगारे आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.