देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात मनोरंजनात्मक फनी गेम्स आणि फिशपॉडद्वारे विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
फनी गेम्स कार्यक्रमाचे उद्घाटन यावर्षीच्या स्नेहसंमेलनाच्या प्रमुख समन्वयक प्रा. सुवर्णा साळवी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, फनी गेम्स समन्वयक प्रा. प्रवीण जोशी, विद्यार्थी विद्यापीठ प्रतिनिधी सुयोग रहाटे, विद्यार्थी स्वराज्य मंडळ सचिव स्नेहा शेट्ये, विद्यार्थी स्वराज्य मंडळ सदस्य, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
फनी गेम्स उपक्रमामध्ये विविध मनोरंजनात्मक, बुद्धिवर्धक आणि संयमाची कसोटी पाहणारे विविध खेळ विद्यार्थ्यांनी आयोजित केले होते. यामध्ये संगीत खुर्ची, बॉलने ग्लास पाडणे, स्ट्रॉने थर्माकोलचे गोळे उचलणे, फळ्यावरील गाढवाच्या चित्राला शेपूट लावणे, एका काडीने मेणबत्ती पेटवणे, बादलीत बॉल टाकने, ग्लास मनोरा, डोळे बांधून काठीने मडके फोडणे, मेमरी गेम्स, अभिनयावरून चित्रपटाचे नाव ओळखणे, बादलीत नाणे टाकने, लाईनमधील बॉल पासिंग शर्यत, फुगे फोडणे, स्टिक रिंग, शब्दावरून गाणी ओळखणे, चमच्याने बाटलीत पाणी भरणे आणि नो रिॲक्शन अशाप्रकारच्या खेळांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कॅन्टीन उपक्रमाला सर्वांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थांसोबत, भारताच्या विविध प्रांतातील तसेच परदेशात नावाजलेले विविध प्रकारचे चविष्ट पदार्थ तयार करून खवय्यांना तृप्त केले.
फनी गेम्सच्या समापनानंतर विद्यार्थ्यांचा आवडता फिशपॉड अर्थात शेलापागोटे कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. सुवर्णा साळवी यांनी केले. यानंतर प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी मार्गदर्शन केले.
वाचिक आणि संगीतमय फिशपॉडना विद्यार्थ्यांनी टाळ्या, शिट्ट्या आणि जोरदार आवाजात प्रतिसाद दिला. दोन सर्वोत्कृष्ट फिशपॉडची निवड करण्यात आली आणि त्या दोन विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी सन्मानित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अजित जाधव यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही समितीतील प्राध्यापक व विद्यार्थी सदस्य, तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.