देवरुख नगरातील आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात दिनांक १४ व १५ सप्टेंबर २०२४ रोजी आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेच्या आयोजनाचे हे सलग तिसरे वर्ष असून सदरची स्पर्धा महाविद्यालयाच्या सुलभाताई आपटे क्रीडा संकुलामध्ये पार पडणार आहे. आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधील 200 पेक्षा अधिक विद्यार्थी सदर स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने सुसज्ज अशा सुलभाताई आपटे क्रीडा संकुलाची निर्मिती केली आहे. सुलभाताई आपटे क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट अत्याधुनिक सेवांनी सुसज्ज असल्याने मुंबई विद्यापीठामार्फत सलग तिसऱ्या वर्षी कोकण विभागीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी दिली आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.
सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संगमेश्वर तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे उत्तम सहकार्य लाभत आहे. सदर स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन संगमेश्वर तालुका बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने श्री मंगेश प्रभुदेसाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दिले आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील जिमखाना प्रमुख डॉ अमित वराळे आणि जिमखाना समितीतील सदस्य प्रा. चन्नय्या हिरेमठ, डॉ राहुल ठोके, प्रा प्रतीक लिंगायत, प्रा शुभम डाफळे, प्रा अजित देवळे, प्रा हेमांगी आग्रे, प्रा पिया मोरे, प्रा देवेश जोग आणि महाविद्यालयातील विविध खेळांमध्ये सक्रिय असणारे विद्यार्थी उत्साह पूर्ण वातावरणात तयारी करत आहेत, महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सलग तिसऱ्या वर्षी विद्यापीठाच्या विभाग स्तरीय बॅडमिंटन स्पर्धा महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करत असल्याबद्दल जिमखाना विभागाचे विशेष अभिनंदन केले. डॉ तेंडोलकर पुढे म्हणाले की या स्पर्धेमुळे देवरुख परिसरातील विद्यार्थ्यांना बॅडमिंटन खेळाकडे निश्चितपणे आकर्षित केले जाईल आणि हा खेळ तळागळापर्यंत रुजण्यास मदत होईल. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सदानंदजी भागवत, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री कृष्णकुमार भोसले, संस्थेचे कार्यवाह माननीय श्री शिरीषजी फाटक आणि संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सदर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.