फोटो- १. मुलांच्या क्रिकेट सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपस्थित शिक्षक व विद्यार्थी.
२. मुलांच्या खो-खो सामन्याचे उद्घाटन करताना उपप्राचार्य डॉ. पाटील, उपस्थित शिक्षक व विद्यार्थी.
विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन ही आनंदाची पर्वणी असते. स्वतःला विविध कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमात सिद्ध करण्यासाठी ही घरची संधी असते. यातूनच विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण वाढण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असते. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाला सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असणाऱ्या क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या आहेत.
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रीडांगणावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या खोखो आणि क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांच्या क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्याचे विधिवत उद्घाटन प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी, तर मुलांच्या खो-खो स्पर्धेतील पहिल्या सामन्याचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी श्रीफळ वाढवून केले. यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा शपथ कनिष्ठ विभागाच्या जिमखाना प्रमुख प्रा. सानिका भालेकर यांनी दिली. यावेळी वार्षिक स्नेहसंमेलन प्रमुख समन्वयक प्रा. सुवर्णा साळवी, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, जिमखाना समन्वयक प्रा. सानिका भालेकर, प्रा. डॉ. अमित वराळे, क्रीडा शिक्षक प्रा. सागर पवार, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. सुनील वैद्य, प्रा. स्वप्नाली झेपले, कनिष्ठ महाविद्यालयाची जी.एस. स्नेहा शेट्ये, क्रीडाविभाग प्रतिनिधी श्रीदीप करंडे, तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलनातील क्रीडा महोत्सवात विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी खो-खो, कबड्डी हॉलीबॉल व रस्सीखेच या सांघिक खेळांसह कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन या वैयक्तिक खेळातील एकेरी व दुहेरी स्पर्धा, तसेच मैदानी स्पर्धेमध्ये धावणे, उडीचे प्रकार, फेकीचे प्रकार, तसेच धावण्याच्या रीले स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. महाविद्यालयातील वार्षिक क्रीडा स्पर्धा १७ ते २१ डिसेंबर या कालावधी संपन्न होणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक, बुद्धीला चालना देणारे, वैविध्यपूर्ण सादरीकरणाला प्रोत्साहन देणारे वेगवेगळे ‘डेज’ महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहेत.
क्रीडा स्पर्धा आणि ‘डेज’च्या समापनानंतर विद्यार्थ्यांसाठी दिंडी, सत्यनारायणाची पूजा, ट्रॅडिशनल डे, विविध गुणदर्शन कार्यक्रम, अल्पोपहार, फनी गेम, फिश पॉन्ड आणि म्युझिक पॉन्ड यांची मेजवानी असणार आहे. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांच्या नियोजनानुसार सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्वराज्य मंडळातील सदस्य वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत.