“वाचन संस्कृती व पुस्तक निवड” या कार्यशाळेत बोलताना प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी.
एक तासाच्या सामूहिक वाचन सत्रात प्राचार्य, उप-प्राचार्य, प्राध्यापक वृंद आणि बहुसंख्य सहभागी विद्यार्थी
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात नववर्षाच्या प्रारंभी करण्यात आला. वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करत तरुणांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला गती देणे आणि समाज प्रबोधन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
१ ते १५ जानेवारी दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या वाचन पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सामूहिक वाचन सत्र आणि “वाचन संस्कृती व पुस्तक निवड” या कार्यशाळेने झाली. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीच्या महत्त्वाबद्दल व कशाप्रकारे पुस्तक निवड करावी याबद्दल मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात वाचनाच्या सवयीचे महत्त्व विशद केले. त्यांनी वाचनामुळे वैयक्तिक विकास कसा साधता येतो आणि त्याचा समाजावर कसा सकारात्मक प्रभाव पडतो, याचे मार्मिक विवेचन केले. यानंतर उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या उपक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली आणि उपक्रमाच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उप-प्राचार्य डॉ. सरदार पाटील, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, भाषाविभाग प्रमुख डॉ. वर्षा फाटक, प्रा. स्नेहलता पुजारी, व प्रा. स्वप्ना पुरोहित, तसेच प्रा. अजित जाधव, प्रा. विकास शृंगारे यांसह महाविद्यालयातील अन्य प्राध्यापक वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत आयोजित १ तासाच्या सामूहिक वाचन सत्रात प्राचार्य, उप-प्राचार्य, प्राध्यापक वृंद आणि बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले. ग्रंथालयात आयोजित या वाचन सत्राने वाचन संस्कृतीचा प्रचार आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीस प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासासाठी आणि समाज प्रबोधनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या अनुषंगाने वाचन कौशल्य कार्यशाळा, ग्रंथालय भेट, पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, वाचन संवाद, लेखक आपल्या भेटीला अंतर्गत नामांकित लेखकांची मुलाखती, पुस्तके आपल्या दारी अंतर्गत विविध गावामध्ये पुस्तकांचे प्रदर्शन, स्थानिक तहसीलदार, पोलीस स्थानक, व नगरपंचायत येथील प्रशासकीय अस्थापनाना च्या निगडीत पुस्तके वाचण्यास देऊन वाचन संस्कृतीस बळकटी आणण्यास प्रयत्न करण्यात येणार आहे. याकरिता ग्रंथालय कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी प्रतिनिधी सहकार्य करणार आहेत. याशिवाय ग्रंथ व दिवाळी विशेषांक प्रदर्शन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक गोकुळ अनाथाश्रमातील विद्यार्थिनी यांसी पुस्तक भेट देऊन वाचन संवाद साधणार आहे. यांसारख्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी दिली. या वाचन संकल्प पंधरवडा आयोजनासाठी उप- प्राचार्य डॉ. सरदार पाटील , ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे , मराठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा फाटक, हिंदी विभाग प्रमुख प्रा. स्नेहलता पुजारी, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. स्वप्ना पुरोहित, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. सुनिल सोनावणे, आणि मराठीचे प्रा. अजित जाधव तसेच ग्रंथालय कर्मचारी स्वप्नील कांगणे व रोशन गोरुले यांचे विशेष योगदान लाभले आहे.
या वाचन पंधरवड्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आणि त्यांना वाचन संस्कृतीशी जोडणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.