देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या द. ज. कुलकर्णी सभागृहात वरिष्ठ विभागाचा वार्षिक परितोषिक वितरण समारंभ उल्हासपूर्ण वातावरणात सपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी उपस्थित होते. सरस्वती पूजन आणि उपस्थितांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रगती शिंदे हिने करताना कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व स्पष्ट केले.
▪️कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी करताना महाविद्यालयातील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेतला. उपस्थित विद्यार्थ्यांना सामाजिक प्रसार माध्यमांचा वापर विधायक कार्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्ञानार्जनासाठी करण्याविषयी याप्रसंगी आवाहन केले. तसेच बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ. सुरेश जोशी यांचा परिचय प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी करून दिला. संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले यांनी डॉ. सुरेश जोशी यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले, तर प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
▪️वार्षिक अहवालाचे वाचन विद्यार्थिनी पायल दोरखडे हिने केले. या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये क्रिडा, कला व सांस्कृतिक स्पर्धा-उपक्रमातील नैपुण्यासाठी विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाकडून दिली जाणारी विशेष रोख रकमेची पारितोषिके विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली. याप्रसंगी ‘स्व. राजा राजवाडे उत्कृष्ट वार्षिकांक पुरस्काराचे’ वितरण करण्यात आले. या वार्षिक अंक स्पर्धेचे परीक्षण निवृत्त शिक्षिका सौदामिनी कुलकर्णी व मंगला अळवणी यांनी केले होते. या स्पर्धेतील गोगटे–जोगळेकर महाविद्याल, रत्नागिरी (प्रथम), डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण (द्वितीय) आणि आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्याल, देवरुख (तृतीय) यांना सन्मानित करण्यात आले. वार्षिक क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त करणाऱ्या तृतीय वर्ष, विज्ञान वर्गाला सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण यादीचे वाचन विद्यार्थिनी प्रीती पाष्टे हिने केले.
▪️डॉ. सुरेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा जीवन प्रवास आपल्या मार्गदर्शनातून सांगितला. त्यांच्या देवरुखमधील ५० वर्षांपेक्षा अधिक वास्तव्यातील आठवणींना उजाळा दिला. आपल्या मनोगताच्या शेवटी त्यांनी विषमता विरहित समाज उभारणीतील तरुणांची भूमिका अधोरेखित केली आणि तरुणांनी विदेशात न जाता भारतातच राहून देशाची व समाजाची सेवा करावी असे आवाहन याप्रसंगी केले.
▪️संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांना मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम विशद केले. त्यांनी तरुणांना स्वतःचा विकास करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहनही याप्रसंगी केले. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संस्था कार्यवाह शिरीष फाटक, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. डॉ. अमित वराळे आणि विद्यार्थी विद्यापीठ प्रतिनिधी सुयोग रहाटे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थिनी ऋतुजा पवार हिने केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.