देवरुख (ता. संगमेश्वर)- आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक २९ जुलै २०२५ रोजी “रसायनशास्त्रातील करिअरच्या संधी” या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादामध्ये पदवी व पदव्युत्तर रसायनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शैक्षणिक, औद्योगिक व शासकीय क्षेत्रातील करिअरच्या विविध वाटा विद्यार्थ्यांपुढे उलगडून दाखवण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमात दोन सत्रांद्वारे मान्यवर तज्ज्ञांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
पहिल्या सत्रात, श्री. जॉन्सन एम. कौटिन्हो, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, सिंजीन इंटरनॅशनल लिमिटेड, बंगळुरू यांनी “फार्मास्युटिकल उद्योगातील संधी” या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. त्यांनी औषध संशोधनातील सध्याच्या घडामोडी, प्रकल्प व्यवस्थापनाची भूमिका, आणि R&D क्षेत्रातील करिअर पर्यायांविषयी मार्गदर्शन केले. सेंद्रिय रसायनशास्त्राचे महत्त्व, औद्योगिक गरजा तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारची तयारी करावी यासंबंधी त्यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
दुसऱ्या सत्रात, प्रा. डॉ. बापूराव शिंगटे, वरिष्ठ प्राध्यापक, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर यांनी “रसायनशास्त्रातील उच्च शिक्षण आणि शासकीय व खाजगी क्षेत्रातील करिअर संधी” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी IIT, NIT, IISc, केंद्रीय व राज्य विद्यापीठे यामधील प्रवेशप्रक्रिया, उपलब्ध जागा तसेच JAM, GATE, CSIR-NET यांसारख्या स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. तसेच, शासकीय क्षेत्रातील संधी जसे की विविध वैज्ञानिक संशोधन संस्था, शिक्षण क्षेत्र, सरकारी प्रयोगशाळा व इतर खात्यांमधील नोकऱ्यांचे स्वरूप, पात्रता व निवड प्रक्रिया यांची माहिती दिली. खाजगी क्षेत्रातील करिअर, विशेषतः फार्मास्युटिकल कंपन्या, रासायनिक उद्योग, R&D युनिट्स आणि गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा यामध्ये उपलब्ध असलेल्या संधी व त्यासाठी आवश्यक कौशल्यांचीही माहिती दिली.
परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी केला. आपल्या समारोपपर भाषणात डॉ पाटील यांनी या प्रकारच्या कार्यशाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराच्या बदलत्या संधी विषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने महत्त्वाच्या असून या कार्यशाळेमुळे रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना उद्योग आणि शासकीय तसेच अशासकीय संस्थांमध्ये असणाऱ्या करिअरच्या संधी मिळविण्यासाठी योग्य दिशा मिळेल, असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र तेंडोलकर यांनी सदर कार्यशाळेला शुभेच्छा देताना कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल रसायनशास्त्र विभागाचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार करता या प्रकारच्या कार्यशाळा महत्त्वाच्या आहेत, असे मत व्यक्त केले.