देवरुख- राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ओणी आयोजित १०वी जयवंत दळवी राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाची ‘हीरो नंबर वन’ ही एकांकिका सहभागी झाली होती. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या एकांकिकेतील कु. साक्षी मधुकर गवंडी हिच्या अलका या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला.
‘हीरो नंबर वन’ या एकांकिकेचे लेखन सागर माने यांनी केले असून, तर दिग्दर्शन सागर माने आणि विक्रांत सामंत यांनी केले आहे. या नाटकामध्ये साक्षी गवंडीसह साहिल खेडस्कर, वैष्णवी साळवी, अफान धामस्कर, तनुजा जठार, केतन कदम, केतकी शेलार, अथर्व पवार, किंजलबेन रैयानी, संकेत जाधव, संग्राम गुरव, रुही गोताड या विद्यार्थी कलाकारांचा सहभाग आहे. या एकांकिकेने राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन रायसोनी चषक व पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठीही यापूर्वी पात्रता प्राप्त केली आहे. साक्षी गवंडी हिने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त केला होता.
साक्षी गवंडी हिने दोन वेळा मिळवलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या एकांकिकेतील विद्यार्थी कलाकारांचे अभिनंदन करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘हीरो नंबर वन’ या एकांकिकेचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. यावेळी साक्षी गवंडी आणि सर्व विद्यार्थी कलाकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नाटकाच्या उत्तम सादरीकरणासाठी
संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी नाटकाच्या संपूर्ण टीमला रोख ₹ १०,०००/- विशेष बक्षीस देऊन गौरविले. एकांकिका संपल्यानंतर संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून मार्गदर्शन केले. यावेळी संस्था उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विकास शृंगारे, प्रा. धनंजय दळवी, प्रा. अक्षय पेठकर, प्रा. सानिका भालेकर, प्रा. चैत्राली कदम आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.