देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ व ज्ञानदा गुरुकुल संस्था, वाघोली, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख येथे ‘प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण’ कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी ज्ञानदा गुरुकुल संस्थेचे मोबिलायझेशन ऑफिसर श्री. सोमनाथ कुलकर्णी, टेक्निकल हेड श्री. सुरज पाटील, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
१८ ते ३० या वयोगटातील तरुणांसाठी हा अभ्यासक्रम ज्ञानदा गुरुकुल संस्थेने तयार केला आहे. या अंतर्गत दोन महिन्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना दिले जाते. अत्यल्प शुल्कामध्ये हा कोर्स महाविद्यालयामध्ये उपलब्ध झाला आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमाचे शुल्क नाममात्र ३,०००/- रुपये आहे. या शुल्कामध्येच देवरुख व पुणे या दोन्ही ठिकाणचे प्रशिक्षण समाविष्ट आहे. हा अभ्यासक्रम १००% नोकरीची हमी देणारा असून, आजवर जवळपास सोळाशे तरुण या अभ्यासक्रमानंतर स्वावलंबी झाले आहेत. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया महाविद्यालयामध्ये सुरू झाली असून, त्याकरिता समन्वयक प्रा. विकास शृंगारे, प्रा. डॉ. मयुरेश राणे, प्रा.अभिनय पातेरे यांच्याशी संपर्क साधावा. संस्थेने सुरू केलेल्या या अभ्यासक्रमाचा लाभ जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी घ्यावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष श्री. सदानंद भागवत व उपाध्यक्षा सौ.नेहा जोशी यांनी केले आहे.