‘पुस्तक आपल्या दारी’ उपक्रम ग्रामीण भागातील वाचनसंस्कृतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या राज्यव्यापी उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘पुस्तक आपल्या दारी’ हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला. ग्रामीण भागात वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी ‘पुस्तक आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत पाटगाव, हातीव आणि देवरुख येथे विविध ग्रंथ प्रदर्शन व पुस्तक भेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून ज्ञानवृद्धीसाठी प्रेरणा दिली.
पाटगाव व हातीव गावांमध्ये बाल साहित्य, साहित्यिक आणि शैक्षणिक ग्रंथांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामध्ये शाळेतील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांवर चर्चा केली आणि विचारांची देवाणघेवाण केली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना नवीन ज्ञान मिळवण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या वैयक्तिक व बौद्धिक विकासाला चालना मिळाली.
देवरुख येथे ‘ज्ञान द्या, संधी द्या’ या उपक्रमांतर्गत अनाथाश्रमामध्ये मुलींना पुस्तके भेट देण्यात आली. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी व प्राध्यापकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या मुलींशी वाचनसंवर्धनाविषयी संवाद साधण्यात आला, ज्यामुळे त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण झाली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. सुनील सोनावणे, मराठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा फाटक, , ग्रंथपाल श्री. सुभाष मायंगडे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. स्वप्ना पूरोहित, हिन्दी विभाग प्रमुख प्रा. स्नेहलता पुजारी, डॉ. प्रशांत नारगुडे, प्रा. पिया मोरे , ग्रंथालय सहाय्यक स्वप्नील कांगणे, रोशन गोरूले तसेच महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.
‘पुस्तक आपल्या दारी’ उपक्रमाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण करून त्यांचा बौद्धिक व वैयक्तिक विकास घडवण्यास हातभार लावला आहे. अशा उपक्रमांमुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळून ज्ञानाचा प्रसार व विकास होण्यास मोठी मदत होत आहे.